मुंबईतील कांदळवनाचे महत्व लक्षात घेत आता अंधेरीतील दुर्लक्षित लोखंडवाला तलाव परिसरालाही कांदळवनाचा दर्जा मिळाला आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आणि राज्य वन्यजीव बोर्डाचे सदस्य आदित्य ठाकरे यांनी मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात लोखंडवाला तलाव परिसराला आता कांदळवनाचा दर्जा देण्याची घोषणा केली. यावेळी आरेतील जंगल प्रदेशाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरु होईल, अशी माहिती त्यांनी आरे वाचावा मोहिमेतील कार्यकर्त्यांना दिली.
कचऱ्याचे साम्राज्य तसेच घाणीमुळे इथली जैवविविधता धोक्यात
लोखंडवाला परिसरातील जैवविविधता पाहता ‘लोखंडवाला तलाव वाचावा’ अशी चळवळही समाजमाध्यमांवर सुरु झाली होती. कचऱ्याचे साम्राज्य तसेच घाणीमुळे इथली जैवविविधता धोक्यात आल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत होते. आज पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांसह, महसूल विभाग तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेत नियमानुसार या जैवविविधतेला सुरक्षित क्षेत्राचा दर्जा जाहीर केला. त्याकरिता आवश्यक सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मेळघाट जंगल भागातून जाणारा रेल्वे मार्ग वळवत नजीकच्या गावांना दळणवळणाची साधने देत जंगलाला वाचवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत, तसेच ठाण्यात घोडबंदर येथील वाहतुकीचा प्रश्न सोडवत बिबट्याचा भ्रमणमार्गाचीही काळजी घेत जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community