कांडला बंदर हेरॉईन प्रकरणातील आयातदाराला बेड्या

113

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकार्‍यांबरोबर संयुक्तपणे विकसित केलेल्या माहितीच्या आधारे, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाचे (डीआरआय) अधिकारी सध्या कांडला बंदर इथे उत्तराखंड स्थित कंपनीने आयात केलेल्या मालाची तपासणी करत आहेत. इराणच्या अब्बास बंदरातून ही खेप कांडला बंदरात आली होती. 17 कंटेनर (10,318 बॅग) मधून आयात केलेल्या मालाचे एकूण वजन 394 मेट्रिक टन आहे आणि ती “जिप्सम पावडर” असल्याचे सांगितले होते. आतापर्यंत 1,439 कोटी रुपये किंमतीचे 205.6 किलो अवैध हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. मालाची सखोल तपासणी अजूनही बंदरात सुरू आहे.

आयातदाराला पकडण्यासाठी डीआरआयचे भारतभर छापे

तपासादरम्यान, आयातदार उत्तराखंडमधील नोंदणीकृत पत्त्यावर सापडला नाही. त्यामुळे आयातदाराला पकडण्यासाठी देशभरात मोहीम सुरू करण्यात आली. आयातदाराचा ठावठिकाणा शोधण्यासाठी डीआरआयने भारतभर विविध ठिकाणी छापे टाकले. ओळख टाळण्यासाठी आयातदार सारखी ठिकाणे बदलत होता आणि लपत होता. मात्र अखेर सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले आणि पंजाबमधील एका लहान गावात हा आयातदार सापडला. आयातदाराने प्रतिकार करून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला पकडले.

(हेही वाचा – अरबी समुद्रात पाकिस्तानी ‘अल हज’ बोट पकडण्यासाठी गोळीबार, 280 कोटींचे हेरॉईन जप्त)

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू

आतापर्यंत केलेल्या चौकशीच्या आधारे, डीआरआयने या आयातदाराला एनडीपीएस कायदा, 1985 च्या तरतुदींअंतर्गत अटक केली आणि त्याला 24.04.2022 रोजी अमृतसरच्या विशेष दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले . डीआरआय अधिकाऱ्यांना या आयातदाराला भुज येथील न्यायालयासमोर हजर करता यावे यासाठी न्यायालयाने ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.