शकुनी काकांचा दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव, पडळकरांचा पवारांवर गंभीर आरोप

95

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या एसटी बॅंक निवडणुकीवरुन गंभीर आरोप केला आहे. एक व्हिडीओ जारी करत पडळकर यांनी म्हटले आहे की, मागील सहा महिन्यांपासून एसटी कर्मचारी आपल्या हक्कासाठी लढा देत होता. आता शकुनी काकांनी याचाच फायदा उचलून दोन हजार कोटीची बँक व त्याची मालमत्ता गिळंकृत करण्याचा डाव आखला आहे. बँकेची निवडणूक घोषीत केली आहे आणि जे सदस्य थकबाकीदार आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार राहणार नाही असा फतवा काढला आहे. असे पडळकरांनी म्हटले आहे.

असे केले 100 कोटी गिळंकृत

साहाजिकच जे कर्मचारी बिनपगारी आपल्या हक्कासाठी लढा देत होते, तेच थकबाकीदार आहेत. त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही. १९९५ ला इंटकला हाताशी पकडून शरद पवारांनी स्वत:च्याच एकमेव संघटनेला मान्यताप्राप्त करून दिली आणि सभासद फीच्या नावाखाली हजारो कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये वसूल केले. त्या व्यतिरिक्त अधिवेशनाखाली ५०० रूपये व वाढदिवसानिमित्त मनसोक्त रक्कम गोळा केली. अशा वेगवेगळ्या मार्गानं जवळपास १०० कोटी रूपये गिळंकृत केल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे.

( हेही वाचा: खाद्यपदार्थांना महागाईचा फटका; वडापाव, समोसा,इडली, डोसा आणि चहाच्या किमतीत वाढ )

मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार

त्यातूनच वर्षाआड आपल्याच बगलबच्च्यांना २०-२० लाखांच्या आलीशान गाड्या खरेदी करून दिल्या. पण ज्यावेळेस एसटी कामगार व त्यांचा परिवार उपाशी पोटी उघड्यावर लढा देत होता, त्यावेळेस या संघटेनेचे सर्वेसर्वा यांनी माणुसकीखातीर आपल्या सिल्वर ओकवरून एक वेळचे जेवण तर सोडा पण साधे चहापाणी सुद्धा पाठवले नाही. जर यांच्यात माणुसकी शिल्लक असती, तर यांनी त्या १३५ विधवा भगिनींना आर्थिक मदत दिली असती. अशा मुघलाई प्रवृत्तींना आम्ही धडा शिकवणार आहोत व कायदेशीररित्या यांचा डाव उधळून लावणार आहोत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.