कर्नाटक राज्यातील दोन नव्या प्रजातींचा शोध मुंबईतील बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)ने लावला आहे. ‘हेमिडॅक्टाइलस महोनी’ आणि ‘हेमिडॅक्टाइल श्रीकांथनी’ असे या दोन नव्या पालींच्या प्रजातींची नावे आहेत. दोन नव्या प्रजातींच्या पालींच्याबाबतीतील शोधनिबंध बुधवारी २७ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय जर्नल झुटेक्सा येथे प्रकाशित झाला.
( हेही वाचा : बूस्टर डोसमधील अंतर कमी होणार? केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय )
दख्खनच्या पठारावरील सरपटणा-या प्राण्यांविषयी अद्याप बरेचसे रहस्य उलगडलेले नाही. कित्येक प्रजाती अद्याप जगासमोर आलेल्या नाहीत. त्यामुळे विविध पर्यावरणप्रेमी संस्था आणि संशोधक कर्नाटक राज्यात सध्या सरपटणा-या प्राण्यांच्या संशोधनावर भर देत आहेत. २०१९ साली कर्नाटकातील सांदूर टेकड्यांमध्ये वसलेल्या जोगा गाव आणि देवरायना दुर्गा पर्वतरांगांमधील तुमकुरु गाव येथे बीएनएचएसचे शास्त्रज्ञ ओंकार अधिकारी यांनी भेट दिली होती. त्यावेळी ओंकार अधिकारी आणि तेलंगण राज्यातील उस्मानिया विद्यापीठातील भारतीय विज्ञान संस्था आणि चेन्नईतील स्नेक पार्कच्या शास्त्रज्ञांना या दोन नव्या पालींच्या प्रजाती आढळल्या. या सर्वांनी मिळून नव्या पालींच्या प्रजातीबाबत संशोधन केले.
पालींच्या शारिरीक रचना वेगळ्या
दोन्ही नव्या पालींच्या प्रजाती हेमिडॅक्टाइल मुर्रेई क्लेड या समूहात मोडतात. या दोन पालींच्या शारिरीक रचना वेगळ्या आहेत. मात्र त्यांच्या शेपटीखालील पायांवर विशिष्ठ खुणा आहेत. या दोन प्रजाती त्यांच्या जवळच्या प्रजातींच्या तुलनेत अनुवांशिक पातळीवर ६.४ टक्के विभिन्न आहेत. भारतात हेमिडॅक्टाइलस वर्गातील पालींच्या प्रजातींची संख्या ४९ पर्यंत नोंदवली गेली होती. आता या नव्या दोन पालींच्या प्रजातींच्या शोधामुळे ही संख्या आता ५१ वर पोहोचली आहे.
- भारतीय सरिसृपांवर भरीव काम करणारे आयरिश शास्त्रज्ञ यांच्या योगदानासाठी एका पालीचे नाव ‘हेमिडॅक्टाइलस महोनी’ असे दिले गेले. या पालीची लांबी ५१ ते ६० मिलीमीटर असून. शरीरभर चॉकलेटी रंग आहे.
- या संशोधनातील सहलेखक एन अच्युतम यांनी आपल्या वडिलांचे नाव एका पालीला दिले. ही पाल हेमिडॅक्टाइल श्रीकांथनी म्हणून ओळखली जाईल. या पालीची लांबी ६६ मिलीमीटर आहे. शरीरभर चॉकलेटी रंग आहे.
- या दोन्ही पाली निशाचर आहेत. दिवसा त्या खडकांवर वास्तव्य करतात. छोट्या आकाराचे मासे, नाकतोडे, फुलपाखरे हे या दोन्ही पालींचे प्रमुख अन्न आहे.
देशाच्या पठारी भागातील कोरड्या भूभागावर अधिवास असलेल्या अनेक सरपटणा-या प्राण्यांवर अभ्यास होणे बाकी आहे, हेच या संशोधनातून निदर्शनास आले आहे. या जैवविविधतेचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे.
-ओंकार अधिकारी, शास्त्रज्ञ, बीएनएचएसजगभरात २१ टक्के सरपटणा-या प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मानवी हस्तक्षेपामुळे सरपटणा-या प्राण्यांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे. पालींच्याबाबतीत भविष्यात होणा-या संशोधनासाठी हे संशोधन मदतीचे ठरेल.
–राहुल खोत, उपसंचालक, बीएनएचएस
Join Our WhatsApp Community