महापालिका वैद्यकीय गटविमा योजना खंडीत झाल्याने कर्मचारी वैद्यकीय लाभापासून वंचित राहू नयेत, यादृष्टीने आता वैद्यकीय गटविमा योजनेऐवजी, कर्मचा-यांना वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम अदा करण्यात येणार आहे. कर्मचा-यास किमान १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त विमा संरक्षण असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम (वस्तू व सेवाकरासह) किंवा १५००० रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम महानगरपालिकेकडून देण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी आता या मे महिन्यापासून होत आहे. ज्या कर्मचाऱ्यांची विमा पॉलिसी नसेल त्यांना पुढील तीन महिन्यात पॉलिसी काढणे बंधनकारक राहील. त्यामुळे कर्मचारी पुढील तीन महिन्यात पॉलिसी काढतील, तेच यासाठी पात्र ठरणार आहेत.
तीन महिन्यात पॉलिसी काढणे बंधनकारक
वैद्यकीय गटविमा योजनेऐवजी, कर्मचा-यांना वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम अदा करण्याबाबत १४ जानेवारी २०२२ ला स्थायी समिती व ११ फेब्रुवारी २०२२ ला महापालिका सभागृहाची मान्यता देण्यात आली. परंतु याची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हायला मे महिना उजाडावा लागला. बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत कर्मचा-यांना (माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगातील अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण येथे प्रतिनियुक्तीवर असलेले कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचारी वगळून) वैद्यकीय गटविमा योजनेऐवजी वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम देण्याकरता परिपत्रकातील नमूद कार्यपध्दती अवलंबिण्यात येणार आहे. १ कर्मचा-यास किमान रु.१ लाख विमा संरक्षण असलेल्या आरोग्य विमा पॉलिसीच्या प्रिमियमच्या रक्कमेची प्रतिपूर्ती मुंबई महानगरपालिकेकडून करण्याबाबतची योजना, परिपत्रक निर्गमित झाल्याच्या तारखेपासून लागू करण्यात येईल.
कर्मचा-याने प्रत्येक वर्षी आरोग्य विमा पॉलिसीचे नुतनीकरण केलेली प्रत संबंधित आस्थापना विभागास सादर करणे आवश्यक आहे. सदर प्रत INPUT च्या अंतिम तारखेच्या आत दिल्यास त्याच महिन्याच्या वेतनामध्ये किंवा पुढील महिन्याच्या वेतनामध्ये पॉलिसीच्या प्रिमियमची रक्कम किंवा रु.१५०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम संबंधित आस्थापना विभागामार्फत आकारण्यात येईल.
कर्मचा-याने यापूर्वी आरोग्य विमा पॉलिसी काढलेली नसल्यास, त्याने स्वतःची वैयक्तिक किंवा कुटुंबियांसहित किंवा स्वत:ची वैयक्तिक आणि कुटुंबियाची वेगळी किमान १ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त विमा संरक्षण असलेली आरोग्य विमा पॉलिसी परिपत्रक निर्गमित झाल्याच्या तारखेपासून ३ महिन्यात काढणे आवश्यक असून, त्याची प्रत संबंधित आस्थापना विभागास सादर करणे बंधनकारक असेल.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ कर्मचारी ६ मे रोजी करणार निदर्शने! )
– पॉलिसी काढल्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी त्याची नुतनीकरण केलेली प्रत आस्थापना विभागास सादर करणे आवश्यक राहील.
-कुटुंबियांच्या व्याख्येत कर्मचारी (स्त्री / पुरुष ) स्वत:, त्याची पती/पत्नी, अपत्ये व कर्मचा-याचे आई-वडील किंवा सासू-सासरे यांचा समावेश असेल.
– परिपत्रक निर्गमित झाल्याच्या तारखेपासून ३ महिन्यांच्या कालावधीमध्ये जे कर्मचारी नवीन आरोग्य विमापॉलिसी काढतील, अशा कर्मचा-यांना पॉलिसी काढत्याची तारीख किंवा ३ महिने यापैकी जी तारीख आधी असेलत्या तारखेपर्यंत प्रमुख कामगार अधिकारी विभागामार्फत राबविण्यात येणा-या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्ती योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. त्यानंतर, वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीच्या योजेनचा लाभ अनुज्ञेय होणार नाही
– नवनियुक्त कर्मचा-यांनी त्यांच्या नियुक्तीपूर्वी आरोग्य विमा पॉलीसी काढली असल्यास त्यांना त्यांच्या नियुक्ती दिनांकाच्या पुढील महिन्यापासून नूतनीकरणाच्या तारखेपर्यंत उर्वरित महिन्यांच्या प्रमाणात पॉलिसीच्या प्रिमियमच्या अनुज्ञेय रक्कमेची प्रतिपूर्ती त्यांच्या वेतनामध्ये आकारण्यात येईल.
-नवनियुक्त कर्मचा-यांनी नियुक्तीपूर्वी आरोग्य विमा पॉलीसी काढलेली नसल्यास त्यांनी सदर पॉलिसी नियुक्ती दिनांकापासून पुढील ३ महिन्यात काढून पॉलिसीची प्रत आस्थापना विभागास सादर करणे अपेक्षित आहे. पॉलिसीची प्रत सादर केल्यानंतर पॉलिसीच्या प्रिमियमची अनुज्ञेय रक्कम त्यांच्या वेतनामध्ये आकारण्यात येईल. तशा सूचना संबंधित नियुक्ती करणा-या विभागाने उमेदवारास नियुक्तीपूर्वीच्या कागदपत्रांची पडताळणी करतेवेळी देणे आवश्यक राहील.
Join Our WhatsApp Community