वाढत्या शहरीकरणात शहरी भागांतील वाढत्या तापमानाला जंगलतोड कारणीभूत असल्याची माहिती भारतीय वेधशाळेचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय मोहापात्रा यांनी दिली. यावर अर्बन अॅक्शन योजना कार्यान्वित असली तरीही शहरीकारणाच्या व्यापात आता किमान तापमानाचा आकडा वाढत असल्याची माहिती त्यांनी दिली.
उन्हाळ्याची सुरुवातच तापदायक
मे महिन्यातील तापमानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यंदाच्या उन्हाळ्याची सुरुवातच तापदायक ठरल्याची कबुली भारतीय हवामान खात्याने दिली. मार्च आणि एप्रिल महिन्यात तापमान वाढीची झळ बसली. या मे महिन्यात राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये कमाल तापमानाच्या सततच्या वाढीमुळे उष्णतेच्या लाटांचा अनुभव येईल. तापमानवाढीची मोठी झळ मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यालाही बसेल. मात्र दक्षिण आणि ईशान्येकडील भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीमुळे दिलासा मिळेल. आसाम व नजीकच्या राज्यांत पाऊस राहील. परंतु इतरत्र भागांत कमाल तापमानात मोठी वाढ नसली तरीही किमान तापमान वाढलेले दिसून येईल.
(हेही वाचा -चंद्रपूरने मोडला तापमानाचा 100 वर्षांचा रेकॉर्ड!)
तासाभराने मिळेल तापमानाची माहिती
मानवी शरीरावर तापमानवाढीचा परिणाम लक्षात घेत सतत तापमानाची माहिती देण्यासाठी भारतीय वेधशाळा आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ देशभरातील विविध राज्यांतील ५० शहरांत स्थानके उभारणार आहेत. या स्थानकांवरील इलेक्ट्रोनिक फलकांवर तासाभराने तापमानाची माहिती दिली जाईल. सध्या दिल्ली स्थानकावर तापमानाची माहिती देणारे केंद्र उभारले गेले आहे. इतर ५० शहरांतील स्थानके वर्षभरात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ उभारणार आहे.
Join Our WhatsApp Community