मे महिन्याच्या सुरुवातीलाच देशाच्या नैऋत्य भागेतील राज्यांचे कमाल तापमान ४७ अंशाच्या घरात पोहोचले आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थानातील शहरांची यादी जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत नोंदवली गेली असताना विदर्भातील उष्णतेच्या लाटांच्या प्रभाव अजून दोन दिवस राहील. मंगळवारी संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट दिसून येणार नाही, असा अंदाज भारतीय वेधशाळेने दिला आहे.
गेली चार दिवस विदर्भातील कमाल तापमानाने मुसंडी मारल्याने जनजीवनावर चांगलाच परिणाम दिसून आला आहे. दुपारच्या प्रहारात उन्हाचा तडाखा जास्त जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमध्ये दिसून येत आहेत. सलग तीन दिवस विदर्भातील बहुतांश भागांतील कमाल तापमान ४५ अंश आणि त्यापुढे नोंदवले जात आहे. त्यामुळे पाण्याची बाटलीसोबत बाळगूनच घराबाहेर पडा, असे डॉक्टरांच्यावतीने सांगण्यात येत आहे. सलग तीन दिवस चंद्रपूर आणि ब्रह्रपुरीतील कमाल तापमानाने ४६ अंशापर्यंत मजल मारली आहे. हा दाह अजून एक दिवस जास्त जाणवेल. मंगळवारी विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या झळा नसतील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्यावतीने दिला गेला.
(हेही वाचा जे जे हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरला मारहाण)
विदर्भातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
- ब्रह्मपुरी – ४६.२
- चंद्रपूर – ४६
- गोंदिया, वर्धा – ४४.८
- नागपूर – ४४.८
- यवतमाळ – ४३.७
- वाशिम – ४२.५