“शेवटचा १ दिवस बाकी, भोंगे बंद झालेच पाहिजे”, मनसेने दिले रिमाइंडर

95

देशभरात सध्या भोंग्यांसंदर्भात राजकीय वर्तुळात वाद सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर भोंग्याबाबत विधान करून मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात त्या समोर हनुमान चालिसा वाजवू, असे आव्हान दिले होते. यावेळी राज ठाकरेंनी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर आता शेवटचा १ दिवस बाकी असून भोंगे बंद झालेच पाहिजे, असे मनसेकडून ट्विट करून रिमाइंडर देण्यात आल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

(हेही वाचा – मनसेतर्फे अक्षय्य तृतीयेला होणारी महाआरती रद्द!)

औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सभा घेतली त्यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे खाली उतरवा नाहीतर आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, असा जाहीर इशारा दिला होता. ईदचा सण झाल्यावर आम्हाला मशिदीवरील भोंगे खाली उतरवलेले दिसले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले होते.

मनसेने दिला इशारा

त्यानंतर आता ‘फक्त एक दिवस बाकी आहे’ असे ट्वीट नवी मुंबईचे मनसे अध्यक्ष आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी केले आहे. भोंगे बंद झालेच पाहिजे नाहीतर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार असे ट्वीट करत त्यांनी इशारा दिला आहे.

तूर्तास एवढंच म्हणत राज ठाकरेंचे ट्विट

दरम्यान, सोमवारी राज ठाकरेंनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये राज ठाकरे म्हणाले, ३ मे रोजी ईद आहे. संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या ४ मे रोजी माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढंच असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.