शहापूरात रानडुक्करांच्या शिकारीच्या आरोपाखाली वनविभागाने दहा आरोपींवर कारवाई केली. त्यानंतर आता या गावातील शिका-यांनी रानडुक्करांची शिकार सोडण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. शहापूर गावातील पेंढरघोळ गावातील ठाकूर या आदिवासी जमातीने बैठक घेऊन हा निर्णय जाहीर केला. याविषयी शहापूर वनाधिका-यांना भेट देऊनही पोलिस पाटील आणि सरपंचांनी आता पुन्हा गावक-यांकडून जंगलातील रानडुक्करांची शिकार करणार नाही, अशी हमी दिली आहे.
पाच दिवसांपूर्वी जंगलाला अचानक वणवा लागल्यानंतर वनाधिका-यांनी ही आग जाणूनबुजून लावल्याचा संशय व्यक्त केला. रात्री टेहाळणी दरम्यान जंगलात दोन माणसांच्या संशयास्पद हाचलाची दिसून आल्या. रात्रीच्या अंधारात ते नाहीसे झाले. त्यातील एकाला सकाळी वनाधिका-यांनी पकडले. रानडुक्करांच्या शिकारीसाठी वणवा लावल्याची कबुली त्याने दिली. तसेच कुजलेल्या मांसात स्फोटके लावून रानडुक्करांची शिकार करण्याचा हेतू होता, असेही आरोपीने कबूल केले. या घटनेतून वनाधिका-यांनी चार आरोपींना ताब्यात घेतले. त्यातूनच रान डुक्करांना मारून शिकार करणा-या दुस-या टोळीचा सुगावा वनाधिका-यांना लागला. शिकारीच्या आरोपाखाली सहा आरोपींना आतापर्यंत वनाधिका-यांनी ताब्यात घेतले.
रानडुक्करांना मारण्यासाठी जंगलात कुजलेल्या मांसात शिकारी स्फोटके लपवायचे. मांसात लपलेले स्फोटक चावल्यानंतर रानडुक्करांचा मृत्यू होतो. अशा पद्धतीने रानडुक्करांची शिकार केली जाते. स्फोटके आणि शिकारीच्या घटनाक्रमांत आरोपींसह स्फोटकांसाठी वापरली जाणारे वागूर काडतूस वनाधिका-यांनी ताब्यात घेतले. २८ एप्रिलपासून वनाधिका-यांनी गावातील शिका-यांना पकण्याचे धडकसत्र पाहता गावाने नुकतीच बैठक घेत रानडुक्करांची शिकार करण्याचा अवैध मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत वनाधिका-यांना भेटून गावक-यांनी आश्वासनही दिले.
रानडुक्करांचे मांस खाणे हीच मुख्य उपजीविका
पेंढरघोळ गावातील ठाकूर ही आदिवासी जमात दिवसा कंत्राटी स्वरुपातील मोलमजुरी करते. रात्री जंगलात रानडुक्करांना मारुन त्यांचे मांस उकळून सुकवून खाते. वर्षानुवर्ष रानडुक्करांना मारणे हा त्यांचा रात्रीचा नित्यनेमाचा कार्यक्रम आहे. रानडुक्करांची शिकार ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार वनगुन्हा ठरते. या कलमांतर्गत शहापूर वनविभाग (प्रादेशिक)च्या वनाधिका-यांनी दहा आरोपींवर कारवाई केली.
कारवाईतील पथक
ही कारवाई ठाणे वनविभाग (प्रादेशिक) अंतर्गत शहापूर विभागाचे उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांनी केली. या कारवाईत वनपाल सुनील भोंडिवले. वनपाल बागुल, वनरक्षक मंगेश शिंदे, सेमेल भोसले, प्रविण विशे, जयसेन गावंडे, चंद्रप्रकाश मोर्या, संदीप जाधव, दादा पाटील, इंदुमती बांगर, रुपाली सोनवणे, कविता बेणके, वनमजूर मधुकर घरत, भरत निचते. राजेश गोळे यांनी सहभाग नोंदवला.
Join Our WhatsApp Community