मुंबईतील दादर आणि माहिम हे विभाग आता डम्पिंग ग्राऊंड बनले आहेत. मागील दीड महिन्यांत दादर आणि माहिम मध्ये तीन ते चार वेळा अनधिकृत डेब्रिज टाकण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून दगड विटांचा भराव अनधिकृतरित्या ट्रकमधून रस्त्यांवर खाली केला जात असताना, अद्याप मुंबई महापालिकेच्या जी-उत्तर विभागाच्यावतीने कडक कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे डेब्रिजचे ट्रक खुलेआम रस्त्यांवर रिकामे करण्याच्या घटनांना पेव फुटले आहेत.
अनधिकृतरित्या खुलेआम रस्त्यांवर टाकले जातात
मुंबई महापालिकेच्यावतीने अनधिकृत दगड-विटांचा भराव(डेब्रिज) रस्त्यांवर न टाकता तो भराव भूमीवर टाकला जावा, यासाठी डेब्रिज ऑन कॉल ही संकल्पना राबवण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या इमारतीच्या बांधकामाच्या टाकाऊ वस्तू तथा दगड विटांचा भराव असेल, तर शुल्क आकारून महापालिका आपल्या ट्रकमधून भराव भूमीवर विल्हेवाट लावते. परंतु मुंबई महापालिकेच्यावतीने रस्त्यांवरील अनधिकृत दगड- विटांचा भराव टाकू नये, म्हणून राबवण्यात आलेल्या संकल्पनेलाच आता काही ट्रक चालकांकडून हरताळ फासला जात आहे. मागील दीड महिन्यांमध्ये लेडी जमशेदजी मार्गावर दोन ठिकाणी तर धारावीमध्ये एका ठिकाणी अशाप्रकारे तीन ते चार वेळा डेब्रिजचे ट्रक अनधिकृतरित्या खुलेआम रस्त्यांवर रिकामी करण्याचे काम होत आहे.
( हेही वाचा: राणा दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर )
या मार्गावरील सिटीलाईट सिनेमाजवळ अशाप्रकारे ट्रकमधील भराव रिकामा केल्यानंतर, काही दिवसांमध्येच शितला देवी मंदिराजवळ अशाच प्रकारे रात्रीच्यावेळी ट्रक रस्त्यावर रिकामा करण्यात आला होता. पण प्रकरणात उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहीम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती त्यामुळे सीसीटीव्हीद्वारे संबंधित ट्रक चालकाचा वाहन क्रमांक टिपून त्याआधारे संबंधित चालकावर कारवाई होणे अपेक्षित होते. पण आजवर कोणत्याही घटनेत चालकांवर कारवाई न झाल्याने त्यांची हिंमत आता वाढत चालली आहे. त्यातूनच सेनापती बापट चौकातून शिवाजी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याच्या सुरूवातीलाच (जिथे रस्त्याचं काम सुरू आहे तिथे) एका इंटेरियर कामातील टाकाऊ साहित्याचा भराव टाकण्यात आला आहे. हा भराव रात्रीच्या वेळेत ठिकाणी टाकला गेला असावा, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. अशा प्रकारे डेब्रिज टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबाबत महापालिकेने ठोस पावले न उचलल्याने अशा प्रकारच्या घटना दादर -माहिम परिसरात वारंवार घडत आहेत. त्यामुळे हा परिसर आता डम्पिंग ग्राउंड बनले आहे की काय असा प्रश्न रहिवाशांना पडू लागला आहे.