इस्रोने शुक्र ग्रहावर मोहीम आखली. चंद्र आणि मंगळावर मोहिमा पाठवल्यानंतर, इस्रो आता सूर्यमालेतील सर्वात उष्ण ग्रहाच्या पृष्ठभागाखाली काय आहे याचा अभ्यास करण्यासाठी शुक्राच्या कक्षेत अंतराळ यान पाठवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेद्वारे, इस्रो केवळ शुक्राच्या पृष्ठभागाचेच नव्हे तर सल्फ्यूरिक ऍसिड ढगांच्या खाली असणारे रहस्ये उलगडण्याची तयारी करत आहे.
(हेही वाचा – दिल्ली, महाराष्ट्रात घातपाताचा कट? हरियाणातून चार संशयित दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात)
शुक्र शास्त्रावरील एक दिवसीय बैठकीला संबोधित करताना, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ म्हणाले की, शुक्र मोहिमेची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार एक प्रकल्प अहवाल तयार केला गेला आहे आणि खर्चाचा अंदाजही लावला गेला आहे. त्यांनी शास्त्रज्ञांना येणाऱ्या परिणामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्र व मंगळावरील मोहिमेनंतर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (इस्रो) आता सूर्यमालेतील सर्वात उष्ण असलेल्या शुक्र ग्रहावर डिसेंबर २०२४ मध्ये अवकाश यान पाठविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
या मोहिमेचा फायदा काय?
- शुक्राच्या पृष्ठभागाखाली तसेच तेथील वातावरणात सल्फ्युरिक ढगांच्या आच्छादनाखाली कोणते घटक आहेत, याचा शोध इस्रो घेणार आहे.
- शुक्र ग्रहाची परिक्रमा करण्याकरिता इस्रो एक यानही तयार करीत आहे. हे यान शुक्राभोवती १०० ते १५० वेळा घिरट्या घालणार आहे.
- शुक्र ग्रहावर असलेले जिवंत ज्वालामुखीचे प्रदेश व लाव्हारसाचे प्रवाह, तेथील पृष्ठभागाची रचना, वातावरणाचा अभ्यास भारत या मोहिमेत करणार आहे.
- सौरवाऱ्यांचा या ग्रहावर होत असलेला परिणामही अभ्यासण्यात येईल.