शिवसेनेला जो नडला त्यांच्या घरावर महापालिकेने हातोडा चालवला असे काही चित्र मागील काही घटनांमधून दिसून येत आहे. हास्यकलाकार कपिल शर्मा, अभिनेत्री कंगना राणौत यांच्या घरातील बांधकाम तोडण्यात आले तर केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे मोहित कंबोज यांच्या पाठोपाठ आता मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठन करण्याची धमकी देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या निवासस्थानाला महापालिकेने नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारमधील शिवसेनेलाच आव्हान दिल्याने आता त्यांच्या ‘शिवतिर्था’वरही महापालिकेची वक्रदृष्टी पडणार का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उपस्थित होऊ लागला आहे.
( हेही वाचा : राज ठाकरेंवर आता शिवसेनेचे ‘बाळासाहेब अस्त्र’ )
अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले
मुंबई महापालिकेत मागील ३० वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेचे आता राज्यातही सरकार आले आहे. त्यामुळे सरकारमध्ये राहून महापालिकेला हाताशी धरून शिवसेनेकडून आपल्यावर टिका करणाऱ्या तथा आरोप करणाऱ्यांचा समाचार घेतला जातो. अभिनेत्री कंगना राणौत यांनी शिवसेनेला शिंगावर घेतल्यानंतर तिच्या विरोधात रस्त्यावर उतरून धडा शिकवण्याची ताकद नसल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांना नोटीस देण्यास लावली आणि त्यानंतर त्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. याप्रकरणी पुढे न्यायालयात हे बांधकाम चुकीच्या पध्दतीने तोडल्याचे समोर आले. राणौत यांच्या नंतर शिवसेनेला कायमच आव्हान देणाऱ्या नारायण राणे यांच्या जुहूमधील अधिश बंगल्याला नोटीस देत त्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहे. यामध्ये जे नियमांचे उल्लंघन करून वाढीव बांधकाम केले आहे, ते नियमित करायला परवानगी न देता ते पाडून टाकण्याच्या हालचाली महापालिकेकडून सुरु आहे.
नोटीस बजावली
राणौत आणि राणे यांच्या प्रकरणातील फॉर्म्युल्याचा वापर शिवसेनेविरोधात बोलणाऱ्या भाजपचे मोहित कंबोज यांच्या विरोधात करत त्यांनाही नोटीस बजावण्यात आल्या. त्यानंतर आता मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठन करण्याचे आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या खारमधील निवासस्थानाला महापालिकेच्या एच पश्चिम विभागाने नोटीस बजावली आहे.
राणा यांच्या लावी या इमारतीतील आठव्या मजल्यावरील घराच्या बाहेर महापलिकेचे अधिकारी नोटीस चिकटवून गेले असून शुक्रवारी सकाळी अकरा वाजता घराची पाहणी करून आराखड्यानुसार घराचे बांधकाम केले आहे का याची तपासणी करणार आहे. त्यानंतर प्राप्त अहवालातील निष्कर्षानुसार पुढील कारवाई विभागाच्या इमारत व कारखाने विभागामार्फत केली जाणार आहे.
‘शिवतिर्थ’लाही महापालिकेची नोटिस दिली जाणार नाही ना?
मात्र, आता भोंग्यावरून सरकारचा जीव मेटाकुटीला आणणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यामुळे आजवरचा इतिहास पाहता यापूर्वीच्या तक्रारींची दखल घेऊन किंवा नव्याने तक्रारदार तयार करून राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील ‘शिवतिर्थ’ येथील निवासस्थानालाही महापालिकेची नोटिस दिली तर जाणार नाही ना अशाप्रकारची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यापूर्वीचा फॉर्म्युला आता राज ठाकरे यांच्या शिवतिर्थावरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशाप्रकारची चर्चा आता जनतेमधून ऐकायला येवू लागल्या आहेत.
राजकारण्याच्या घरांना नोटीस देण्याची ही चाल नवीन वाटत असली तरी याची सुरुवात ही कपिल शर्मा यांच्यापासून झाली. कपिल शर्मा यांनी ट्विटरवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याची दखल घेत शर्मा यांचा सेट के पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडला होता. त्यानंतर महापालिकेवर खड्डयावरून टिका करणाऱ्या रेडीओ जॉकी मलिष्का या बाहेरगावी असताना त्यांच्या निवासस्थानी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून मलेरियाच्या अळ्या सापडल्याचे दाखवून त्यांना नोटीस देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे आजवर जो शिवसेनेला नडला त्याला महापालिकेला हाताशी धरून सरळ करण्याचे काम सत्ताधारी पक्षाने केले होते. त्यामुळे आता शिवतिर्थावर तशी महापालिकेची वक्रदृष्टी पडणार नाही असा प्रश्न आता सर्वांनाच पडू लागला आहे.
Join Our WhatsApp Community