एका २२ वर्षांच्या विवाहितेच्या हत्येनंतर तिच्या मारेकऱ्यांचा शोध नखात सापडलेल्या रक्ताच्या डागामुळे लागला. पोलिसांनी बारकाईने केलेल्या तपासामुळे या तरुणीच्या मारेकऱ्याला अटक करून गुन्हा उघडकीस आणण्यात साकीनाका पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांची दिशाभूल केली
विवाहित महिलेचा मारेकरी तिचा पतीच आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्याने तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली. रिमा यादव (२२) असे हत्या करण्यात आलेल्या विवाहितेचे नाव होते, रिमा हिचा वर्षभरापूर्वीच मनोज प्रजापति याच्यासोबत विवाह झाला होता. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद सुरू झाल्यामुळे दोघे वेगळे राहत होते. रिमा ही साकिनाका असल्फा व्हिलेज येथील जंगलेश्वर मंदिराच्या मागे असणाऱ्या बारदान गल्लीत एकटी राहत होती. एका खाजगी कारखान्यात कामाला असणाऱ्या रिमाची नोकरी गेल्यामुळे त्याच परिसरात राहणारा रोहित रविदास हा तरुण तिला सकाळचा नाश्ता आणि जेवण आणून देत होता.
सोमवारी सकाळी तो नाश्ता देण्यासाठी गेला तेव्हा त्याला रीमा रक्ताच्या थारोळ्यात आढळली. या घटनेची माहिती साकिनाका पोलीस ठाण्यात देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत अज्ञात व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मारेकऱ्याचा शोध घेत असताना पोलिसांनी संशयित म्हणून चौकशीसाठी तिचा पती मनोज प्रजापति याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती, मात्र मी हत्या केलीच नसून मला याबाबत काही माहित नसल्याचे तो पोलिसांना सांगत होता. अखेर पोलिसांनी बारकाईने त्याच्या शरीराचे निरीक्षण केले असता त्याच्या हाताच्या एका नखात रक्ताचे डाग मिळाले. त्यानंतर देखील त्याने बोटाला जखम झाली होती असे सांगून पोलिसांची दिशाभूल केली.
अखेर गुन्ह्याची कबुली
अखेर पोलिसांनी त्याच्या नखातील रक्त आणि रिमाच्या रक्ताचे नमुने घेऊन तपासले असता दोन्ही नमुने जुळले. पोलिसांनी अखेर त्याची उलट तपासणी केली असता त्याने कबुली देत चारित्र्याच्या संशयावरून ही हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.
Join Our WhatsApp Community