मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. या प्रकल्पाचे काम 23 मे 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र ते शक्य न झाल्यामुळे कंत्राटदाराने कामासाठी आता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत वाढवून देण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे सादर केला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती उघड झाली आहे.
24 मार्च 2021 रोजी या स्मारकाचे बांधकाम सुरु करण्याचे आदेश देण्यात आले होते. या प्रकल्पाचा कालावधी 14 महिन्यांचा ठरवण्यात आला होता. त्यानुसार, 23 मे 2022 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण कोविड-19 महामारीमुळे कुशल-अकुशल मनुष्यबळ आणि इमारत बांधकामाच्या साहित्याच्या उपलब्धतेअभावी काम पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. स्मारकाच्या कामासाठी 31 मार्च 2022 पर्यंत 46 कोटी 68 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
100 कोटी रुपयांची तरतूद
दादर येथे महापौर निवासाच्या जागी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय तत्कालीन फडणवीस सरकारने घेतला होता. दोन टप्प्यांत या स्मारकाचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी महापौरांचे निवासस्थान भायखळा येथील जीजामाता उद्यानातील अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले आहे. स्मारक उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे असून, त्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
अशी आहे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याची रचना
शिवाजी पार्क येथे उभारल्या जाणा-या स्वर्गीय बाळासाहेब राष्ट्रीय स्मारकाचा तळ आणि पहिल्या मजल्यावर ‘इमर्सिव्ह म्युझियम’ साकारले जाणार आहे. या स्मारकाच्या बेसमेंटमध्ये वाचनालय, ऑफीस, म्युजियम शाॅप आणि आर्ट गॅलरी उभारण्यात येणार आहे. तसेच, पाण्याचे कारंजे उभारले जाणार आहे. तळ मजल्यावर कॅफे, कलाकारांसाठी एक खोली, केबिनसह एक ऑफीसही असेल.
( हेही वाचा: मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावाची रंजक कहाणी )
वास्तूचे केले जाणार जतन
आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक अंडरग्राऊंड होणार आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी ऐतिहासिक वास्तू असलेल्या या बंगल्याची कोणत्याही प्रकारे तोडफोड केली जाणार नाही. महापौर बंगल्याला ऐतिहासिक वारसा असून, पुरातत्व विभागाकडून ब दर्जा आहे. या वास्तूचे जतन करुन त्याचे पर्यटनात रुपांतर केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community