उष्णतेच्या लाटांची भीती…शिक्षण मंत्रालयाने शाळांसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचना!

138

उष्णतेच्या लाटेच्या दुष्परिणामांचा सामना करण्यासाठी शाळांनी घ्यायच्या खबरदारीबाबत शिक्षण मंत्रालयाने आज खालील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

( हेही वाचा : वेतनवाढीबाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! )

1. शाळेच्या वेळेत आणि रोजच्या दिनक्रमात बदल

  • शाळा सकाळी लवकर सुरू करता येतील आणि दुपारच्या आधी सोडता येतील. वेळ सकाळी 7.00 वाजल्यापासून करता येईल.
  • रोजच्या शाळेच्या तासांची संख्या कमी करता येईल.
  • विद्यार्थ्यांचा थेट सूर्यप्रकाशाशी संपर्क येईल असे खेळ/इतर मैदानी उपक्रम सकाळी लवकर आयोजित करावेत.
  • शालेय विद्यार्थ्यांचे एकत्रित उपक्रम छप्पर असलेल्या ठिकाणी किंवा कमी काळासाठी वर्गखोल्यांमध्ये आयोजित केले पाहिजेत.
  • शाळा संपल्यानंतर मुले घरी जातानाही अशीच काळजी घेतली जाऊ शकते.

2. वाहतूक

  • शाळा बस/व्हॅनमध्ये जास्त गर्दी नसावी. त्यात आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी नेऊ नयेत.
  • बस/व्हॅनमध्ये पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचार साहित्य उपलब्ध असावे.
  • पायी/सायकलवरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना डोके झाकून ठेवण्याचा सल्ला देण्यात यावा.
  • सार्वजनिक वाहतूक टाळण्यासाठी आणि उन्हात जास्त काळ राहावे लागू नये म्हणून विद्यार्थ्यांची ने-आण शक्यतो स्वत: करण्यासाठी पालकांना उद्युक्त केले पाहिजे.
  • शाळा बस/व्हॅन सावलीच्या ठिकाणी उभी करावी.

3. हायड्रेशन

  • विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:च्या पाण्याच्या बाटल्या, टोप्या आणि छत्र्या सोबत ठेवण्याचा आणि उघड्यावर असताना वापरण्याचा सल्ला द्यावा.
  • शाळेने शक्यतो आजूबाजूच्या तापमानापेक्षा कमी तापमानात अनेक ठिकाणी पुरेशा पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी.
  • थंड पाणी पुरवण्यासाठी वॉटर कूलर/मातीची भांडी (माठ) वापरण्याचा विचार करावा.
  • प्रत्येक तासाला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आठवण करुन द्यावी, की त्यांनी आपल्या पाण्याच्या बाटलीतून थोडे थोडे पाणी प्यावे.
  • घरी जातांना सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जवळ पाण्याची भरलेली बाटली असेल, यांची शाळा प्रशासनाने खातरजमा करावी.
  • उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी, शरीरात पाण्याचं योग्य प्रमाण असणं किती आवश्यक आहे, याचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगावे. त्यासाठी थोड्या थोड्या वेळाने, पाणी पीत राहावे, असा सल्ला त्यांना द्यावा.
  • शरीरात पाणी जास्त झालं, तर मुलांना स्वच्छतागृहांचा वापर अधिक करण्याची गरज भासू शकते, यासाठी शाळा प्रशासनाने दक्ष राहावं, स्वच्छतागृहे, स्वच्छ आणि निर्जंतुक राहतील, याची काळजी घेतली जावी.

4. अन्न आणि भोजन

पीएम पोषण :

  • अति उष्णतेमुळे अन्न खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पीएम पोषण योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न ताजे आणि गरमच दिले जावे. त्यावेळी शाळेत असलेल्या शिक्षक/शिक्षिकांनी मुलांना माध्यान्ह भोजन वाढण्यापूर्वी स्वतः खाऊन बघावे.
  • जी मुले शाळेत डबा घेऊन येतात, त्यांना डबा आणू नये असं सांगावं, कारण, उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते.
  • शाळेच्या उपाहारगृहात देखील, ताजे आणि सकस पदार्थ विकले जातील अशी काळजी घ्यावी.
  • जेवणाच्या वेळी, किंवा डब्यात पचायला हलका आहार घेण्याचा सल्ला मुलांना द्यावा.

5. आरामशीर वर्गखोल्या

  • शाळेतल्या सर्व वर्गखोल्यांमधील पंखे सुरु आहेत आणि सर्व वर्ग मोकळे, हवेशीर आहेत याची शाळा व्यवस्थापनाने काळजी घ्यावी.
  • जर शक्य असेल, पर्यायी वीजव्यवस्थेची तरतूद करावी.
  • पडदे/ आच्छादन पट्ट्या/ वर्तमानपत्रे यांचा वापर करुन, वर्गात थेट सूर्यप्रकाश पडणार नाही, याची काळजी घेतली जावी.
  • जर शाळेत, उन्हे येऊ नयेत म्हणून काही पारंपरिक पद्धती, जसे की, वाळ्याचे पडदे, बांबूच्या ताट्या, तागाचे पडदे वापरले जात असतील, तर त्यांचा वापर सुरु ठेवावा.

6. गणवेश

  • विद्यार्थ्यांना ढीले आणि फिक्या रंगाचे सूती कपडे वापरण्याची परवानगी दिली जावी.
  • उन्हाळ्याच्या दिवसांत गणवेशात टाय सारख्या त्रासदायक वस्तूंची सक्ती करु नये.
  • चामडयाच्या पादत्राणांऐवजी, कॅनव्हासचे बूट वापरण्याची परवानगी द्यावी.
  • विद्यार्थ्यांना पूर्ण बाह्या असलेले शर्टस वापरण्याचा सल्ला द्यावा.

7. प्रथमोपचार सुविधा

  • विद्यार्थ्यांना उष्माघाताचा सौम्य झटका बसल्यास, ओआरएस द्रावणाची पाकीटे, किंवा मीठ-साखरेचे द्रावण लगेच मिळू शकेल, असे हाताशी सज्ज ठेवावे.
  • एखाद्याला उष्माघाताचा त्रास झाल्यास, त्याच्यावर काय प्रथमोपचार करायचे याचे प्रशिक्षण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना द्यावे.
  • उष्माघाताचा त्रास झाल्यास, विद्यार्थ्यांना त्वरित उपचारांसाठी, जवळच्या रुग्णालयात/दवाखान्यात/डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था केली जावी..
  • अत्यावश्यक औषधांच्या वैद्यकीय कीट्स शाळेत उपलब्ध असाव्यात.

8. विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करू नये

उष्णतेच्या लाटेदरम्यान विद्यार्थ्यांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबतच्या सूचना शाळेतील प्रमुख ठिकाणी लावण्यात याव्यात. यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश असू शकतो:-

करा –

  • तहान लागली नसली तरी पुरेसे पाणी प्या
  • शरीरात पुरेसे पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी ओआरएस (जलसंजीवनी ), घरगुती पेय जसे की लस्सी, पेज, लिंबू पाणी, ताक, इत्यादी पेयांचे सेवन करा.
  • हलके, फिकट रंगाचे, सैल, सुती कपडे घाला.
  • कापड, टोपी किंवा छत्री इत्यादी वापरून आपले डोके आच्छादित ठेवा.
  • शक्यतो घरातच रहा
  • तुम्हाला अशक्तपणा किंवा आजारी असल्यासारखे वाटत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांकडे जा

करू नका –

  • रिकाम्या पोटी किंवा एकदम भरपेट खाऊन घराबाहेर पडू नका
  • आवश्यकता नसल्यास उन्हात बाहेर जाणे टाळा, विशेषतः दुपारी बाहेर जाणे टाळा
  • दुपारच्या वेळी बाहेर असताना दगदग घडेल, असे काही करू नका
  • बाहेर अनवाणी जाऊ नका
  • जंक फूड/शिळे/मसालेदार अन्न खाऊ नका

9. परीक्षा केंद्रे

  • मुलांना परीक्षा कक्षात स्वतःची पिण्याच्या पाण्याची पारदर्शक बाटली घेऊन जाण्यास परवानगी दिली जाऊ शकते.
  • परीक्षा केंद्रांनी केंद्रांवर उमेदवारांना सहज उपलब्ध होऊ शकेल अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी.
  • उमेदवारांना परीक्षा कक्षामधील त्यांच्या जागेवर त्वरित पाणी पुरवले जाईल, याची काळजी परीक्षा केंद्रांनी घ्यावी.
    परीक्षा कक्षात पंखे पुरवले जाऊ शकतात.
  • परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी प्रतिक्षेच्या ठिकाणी छत असावे. तसेच पाण्याची सोय असावी.
  • कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी परीक्षा केंद्रे स्थानिक आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय केंद्रांच्या संपर्कात असावीत.

10. निवासी शाळा

  • याव्यतिरिक्त, निवासी शाळा पुढील अतिरिक्त उपाययोजना करू शकतात
  • उन्हाळ्याशी संबंधित सामान्य आजारांसाठी आवश्यक औषधे स्टाफ नर्सकडे उपलब्ध असावीत.
  • उष्माघातापासून बचाव करण्याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करावे
  • शयनगृहातील खिडक्यांना पडदे पुरवावेत .
  • लिंबू, ताक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या हंगामी फळांचा आहारात समावेश करावा.
    मसालेदार अन्न टाळावे.
  • वर्गखोल्या, वसतिगृहे आणि भोजनकक्षात पाणी आणि विजेची सातत्यपूर्ण उपलब्धता सुनिश्चित करावी.
    खेळ आणि क्रीडाप्रकारांचे आयोजन संध्याकाळी करावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.