यंदा मान्सून वेळेच्या आधीच होणार दाखल! काय म्हणते हवामान खाते?

92
यंदाच्या वर्षी पावसाळा वेळेच्या आधीच दाखल होणार आहे. अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वप्रथम नैऋत्य मोसमी वारे धडकून १५ मे रोजी हंगामातील पहिला पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी, १२ मे २०२२ रोजी दिली. १५ मे २०२२ रोजीच्या सुमारास नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात धडकण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

यंदा केरळमध्ये लवकर मान्सून दाखल

दरवर्षी साधारणत: १ जून रोजी केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल होत असतो. मात्र यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस एक आठवडा आधीच आगमन करण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या हालचालीमुळे यंदा केरळमध्ये लवकर मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय येत्या पाच दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या १४ ते १६ मे या कालावधीत अंदमान निकोबार बेटांवर अचानक मुसळधार पाऊस धडकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान १५ मे आणि १६ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही आयएमडीने वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.