बेस्टमधील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकस आहार मिळावा यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी ‘अक्षय चैतन्य’ योजना सुरु केली असून बेस्टच्या १३ आगारांमधील उपहारगृहांमध्ये टचस्टोन फाऊंडेशनच्यावतीने १८ रुपयांमध्ये नाश्ता आणि ३५ रुपयांमध्ये जेवण पुरवले जात आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि लोकेश चंद्र यांच्या पुढाकाराने ही योजना सरू करण्यात आलेली आहे. यासाठी बेस्टच्या १२ आगारातील उपहार गृह बंद करून बेस्ट आणि टच स्टोन फाऊंडेशनच्या मदतीने ही योजना राबवली जात असून सकाळच्या नाश्तामध्ये उपमा, पोहा, साबुदाना खिचडी, ढोकळा चटणी दालिया उपमा, आदींचा समावेश आहे. परंतु याबाबत बेस्ट कामगारांमध्ये नाराजी आहे.
( हेही वाचा : १ जून पासून मुंबई पोलिसांचा मोफत ‘बेस्ट’ प्रवास बंद होणार )
निर्णयाविरोधात बेस्ट कामगार संघटना आक्रमक
या नव्या योजनेमुळे मराठी कामगारांची आवड बाजूला सारत मांसाहारी पदार्थ कामगारांसाठी बंद करण्यात आले आहेत. बसेस वेळापत्रकानुसार चालत नाहीत परंतु उपक्रमाचे कॅफेटेरीया सर्व्हिसचे वेळापत्रक ठरले आहे असा आरोप बेस्ट कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी कामगारांनी काय खाल्ले पाहिजे हे या पुढे पर्यावरण मंत्रालय ठरवेल असा खोचक टोलाही बेस्ट कामागार संघटनेने सत्ताधाऱ्यांना लगावला आहे. या निर्णयाविरोधात बेस्ट कामगार संघटना आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
बेस्टची उपहारगृह २४ तास सुरु असायची. पण अक्षय चैतन्य योजनेतंर्गत सकाळी व दुपारी ठराविक वेळेतच हा आहार मिळणार असून पहाटे चार वाजता ड्युटीवर येणारा कर्मचारी व रात्रभर सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना ही सेवा मिळणार नाही. त्यामुळे यापूर्वी आगारांच्या मोकळ्या जागा घशात घातल्या, तशाच आता बांधिव जागा घशात घालण्याचा डाव आहे. असा आरोप बेस्ट कामगार संघटनांकडून केला जात आहे.
अक्षय चैतन्य योजना वेळ
- नाश्ता ७.३० ते ९.३०
- दुपारचे जेवण ११ ते २.३०
- संध्याकाळ नाश्ता ४ ते ६
- रात्रीचे जेवण ७.३० ते १०.३०