विनापरवाना रक्तदाबाची डिजीटल मशीन विकल्याप्रकरणी कंपन्यांवर कारवाई

81

शरीरातील रक्तदाब मोजण्याची डिजीटल मशीन्स विकताना परवाना न घेतल्याप्रकरणी अपोलो फार्मसीला अन्न व औषध प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. अपोलो फार्मसीकडून चेंबूर येथील कॉन्सेप्शनर वेन्चर्स या कंपनीकडून डिजीटल रक्तदाब मशीन बनवून विक्री केली जात होती. परंतु कॉन्सेप्शनर वेन्चर्स कंपनीने विनापरवाना हा उद्योग सुरु केल्याने अन्न व औषध प्रशासनाने दोघांविरोधातही गोवंडीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी गेल्या दोन वर्षांत बाजारात विकलेल्या सर्व मशीन्स आम्हाला परत द्या, असे आवाहन करणारी जाहिरात करण्याची नामुष्की अपोलो फार्मसीवर ओढावली आहे.

( हेही वाचा : आता आम्ही काय खायचे? बेस्ट कामगार झाले संतप्त! )

विक्री केलेला सर्व माल परत मागवा

रक्तदाब मोजणा-या मशीन्स या अगोदर मानवी मोजणीतून व्हायच्या. या मशीन्स बनवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाचा परवाना लागत नव्हता. कालांतराने डिजीटल रक्तदाबाच्या मशीन्स बाजारात उपलब्ध झाल्या. परंतु या मशीन्स सदोष आहेत की नाही, याची तपासणी करणे बंधनकारक असल्याचा नियम जाहीर करण्यात आला. मशीन तपासल्यानंतरच आवश्यक परवाना अन्न व औषध प्रशासनाकडून मिळतो. मात्र हा नियम धाब्यावर बसवून चेंबूर येथील कॉन्सेप्शनर वेन्चर्स ही कंपनी चीनमधून कच्चा माल आयात करुन मशीन बनवत होती. कोरोना काळात रक्तदाबाच्या मशीन्सची विक्री वाढल्याने अपोलो फार्मसीने दोन वर्षांत ‘कॉन्सेप्शनर वेन्चर्स’कडून तब्बल ८२ हजार ५१० मशीन्सची खरेदी करून त्याची विक्री केली. विक्री केलेला सर्व माल परत मागवा, असा आदेश अन्न व औषध प्रशासनाने अपोलो फार्मसीला दिला. विकलेल्या सर्व मशीन्स पुन्हा मागवण्याचा आदेश कॉन्सेप्शनर वेन्चर्सलाही दिल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.

रक्तदाब मोजण्याची मशीन सदोष असल्यास चाचण्यांचा अहवाल चुकीचा येतो. त्यामुळे उपचारांची दिशाही चुकण्याची भीती असते. हा गंभीर गुन्हा असून, आम्ही न्यायालयांत अपोलो फार्मसी आणि कॉन्सेप्शनर वेन्चर्सविरोधात खटला दाखल करणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली. गुन्हा सिद्ध झाल्यास दोघांनाही ७ लाखांचा दंड आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासही होऊ शकतो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.