होमग्राऊंडवर येताच निवडणुकांबाबत फडणवीसांचं मोठं भाकित! म्हणाले…

103

गोवा विधानसभा निवडणुकीच्या यशानंतर गुरूवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुंबईत जंगी स्वागत झाल्यानंतर आता होम ग्राऊंड असणाऱ्या नागपुरात नागपुरकरांनी दणक्यात स्वागत केले. नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपने उत्तम कामगिरी करत पाच पैकी चार राज्यांमध्ये आपली सत्ता कायम ठेवली आहे. यापैकी गोव्यात फडणवीस निवडणूक प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपनं एकहाती विजय खेचून आणला त्यामुळे भाजप नेत्यांकडून सध्या त्यांचे जोरदार कौतुक होत आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील निवडणुका आणि राजकारणाबाबत एक मोठं भाकित वर्तविले आहे. यामुळे विरोधी पक्षांच्या गोटात एकच चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

गोवा, उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंडमध्ये मिळालेला विजय हा एकप्रकारे मोदीजींच्या कामाची दिलेली पावतीच आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती तिच आहे आणि सारं काही जनतेने दिलेल्या आशीर्वादामुळे हे शक्य आहे. 2024 साली महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचं सरकार भाजप तयार करणार हे निश्चित आहे. महाराष्ट्रात भाजप एकटात स्वबळावर सत्तेत येईल. आज माझं हे भाकित लिहून घ्या. 2024 मध्ये भाजप स्वतःच्या ताकदीने महाराष्ट्र सत्तेत असेल. राजकारणात काहीही होऊ शकतं. पण मी असं म्हटलं की, तुम्ही लगेच सरकार पाडणार, पडणार अशा चर्चा सुरू करता आणि त्यात मला इच्छा नाहीये.

(हेही वाचा – “सत्ता नसल्यानं वैफल्य येऊ शकतं पण…”, राऊतांचा भाजपवर हल्लाबोल)

जी संधी मिळाली त्याचं सोन करण्याचा प्रयत्न

पुढे फडणवीस असेही म्हणाले, मुंबई नागपूरात होत असलेल्या शक्तीप्रदर्शनापेक्षा हा एक आनंदोत्सव आहे. इतका चांगला विजय मिळवल्यानंतर हा आनंदोत्सव साजरा होणारच आहे. येत्या काळात राज्यातील महानगरपालिका असो, जिल्हा परिषद निवडणुका असो त्या प्रत्येक निवडणुकीत आपल्याला पहायला मिळेल. त्यामुळे कोणत्याही निवडणुका असतील तेव्हा भाजपचं नंबर १ चा पक्ष असेल. मला असे वाटते, हा सत्कार मी स्वीकारतोय. मोदीजींच्या वतीने आणि टीम गोव्याच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात स्वीकारतोय. खरे श्रेय त्यांचे आहे. जी काही संधी मिळाली त्याचे सोन करण्याचा प्रयत्न केला. मोदीजींच्या बाबत जे काही सकारात्मकता, विश्वास आहे त्याचा हा विजय आहे. आपल्या लोकांनी दिलेले प्रेम आहे असे म्हणत फडणवीसांनी जनतेचे आभार मानले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.