मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटकेत असलेले राज्यमंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी त्यांच्या मुलाला चक्क परदेशातून कॉल आल्याचा प्रकार समोर आला आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून बोलणाऱ्या व्यक्तीने मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी मलिक यांच्या मुलाकडे १० बिटकॉइन म्हणजे ३ कोटी रुपयांची मागणी केली आहे. मलिक यांचा मुलाने याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटक केली आहे. नवाब मलिक हे सध्या आर्थर रोड तुरुंगात असून त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. १४ मार्च रोजी मलिक यांचा मुलगा अमीर मलिक याला एक आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीने कॉल केला होता. नवाब मलिक यांना जामीन मिळवून देण्यासाठी त्याने मलिक यांच्या मुलाकडे १० बिटकॉईन म्हणजे ३ कोटी रुपयांची मागणी केली. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव न सांगता ही मागणी केली आहे. कोणीतरी आपली फसवणूक करतंय हे लक्षात येताच मलिक यांच्या मुलाने बुधवारी रात्री कुर्ला विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर गुन्हे शाखा आणि गुन्हे शाखेची मदत घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा कॉल कुठल्या देशातून आला याबाबत काहीही स्पष्ट झालेले नाही.
Join Our WhatsApp Community