यंदाही धुळवडीला मिळणार नाही जादा पाणी!

91

रंगपंचमीच्या दिवशी मोठ्याप्रमाणात सण साजरा केला जात असल्याने या धुळवडीच्या दिवशी मागील काही वर्षांपासून जादा पाणी सोडण्याची प्रथा यंदाही खंडीत करण्यात आली. धुळवडीला एरव्ही तलावांमध्ये कमी पाणी साठा असेल तरच पाणी पुरवठा करण्यात येत नव्हता. परंतु मागील काही वर्षांपासून जादा पाणी सोडण्याची प्रथा बंद झाली असून यंदाच्या रंगपंचमीला तलावांमध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असूनही यंदाच्या धुळवडीला जास्त पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे सध्या जेवढा पाणी पुरवठा केला जात आहे, तोच कायम राखण्याची कसरत महापालिका जलअभियंता विभाग करत आहे.

( हेही वाचा : Holi New Guidelines: आता बिनधास्त साजरी करा होळी आणि धुळवड! )

दरदिवशी होणारा पाणी पुरवठा सुरळीत

मुंबईत दरदिवशी ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असून मागील काही दिवसांपासून संपूर्ण मुंबईत १५ टक्के कपात लागू आहे. भातसा येथील विद्युत केंद्रात बिघाड झाल्याने त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. मात्र, तुर्तास महापालिकेने अन्य मार्गाने पाणी मिळवून कपातीचा बॅकलॉग भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे बुधवारपासून मुंबईला दरदिवशी होणारा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याचा दावा जलअभियंता विभागाने केला आहे.

सध्या असलेला पाणी पुरवठा कायम राखण्याचे आव्हान

मात्र, यंदा मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये चांगल्याप्रकारे पाऊस पडल्याने तलावांमध्ये वर्षभर पुरेल एवढा पाणी साठा जमा झाला होता. सध्या सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणी साठाही आहे. त्यामुळे यंदाच्या रंगपंचमीच्या दिवशी ३८०० दशलक्ष लिटरच्या तुलनेत जादा पाणी पुरेल एवढा पाणी साठा असणे अपेक्षित मानले जाते. आधीच मुंबईमध्ये उष्म्याचा पारा वाढलेला आहे, त्यातच रंगपंचमीला रंगाची उधळण करत सण साजरा केला जातो. त्यामुळे रंगाने सर्वांना रंगवले जात असल्याने यासाठी पाण्याचा वापर अधिक होतो. धुळवडीला पाण्याचा मारा करत भिजवले जात असल्याने अधिक पाण्याची गरज असते. त्यामुळे यापूर्वी रंगपंचमीच्या दिवशी महापालिकेच्यावतीने जादा पाण्याचा पुरवठा केला जायचा. परंतु मागील काही वर्षांपासून ही प्रथा खंडित करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेलाही आता जादा पाणी पुरवठा करण्याचा विसर पडला आहे.

मुंबईत मागील काही दिवसांपासून सुरु असलेली पाणी कपात विद्युत दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नसतानाही पूर्वव्रत करण्यात महापालिकेला यश आलेले आहे. त्यामुळे सध्या असलेला पाणी पुरवठा कायम राखण्याचेच आमच्यासमोर आव्हान असून जादा पाणी कुठून देणार असा सवाल महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.