देशाच्या उत्तर पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. विदर्भात उष्णतेची लाट आली असून पुढील ४८ तास ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. एकीकडे होळीनंतर राज्यातील तापमानाने चाळीशी गाठल्यानंतर, दुसरीकडे काही भागात मात्र हवामान विभागाने हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.
( हेही वाचा : महिलांना मोफत बस सुविधा देणारी ‘ही’ आहे देशातील पहिली महापालिका! )
१९ आणि २० मार्चला हलक्या पावसाची शक्यता
मुंबईसह, विदर्भ, मराठवाडा मध्य महाराष्ट्रात तापमानाचा जोर चांगलाच वाढला आहे. विदर्भात दोन दिवस उष्णतेची लाट येणार असून पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. परंतु बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होत आहे. त्याचा परिणाम म्हणून दक्षिणेकडील काही भागामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात प्रामुख्याने दक्षिण कोकणात १९ आणि २० मार्चला हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
गेले काही दिवस कर्जतमध्ये राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाची नोंद होत असताना शुक्रवारी मात्र अकोल्यातील कमाल तापमानाने पहिला क्रमांक गाठला. अकोल्यातील कमाल तापमान ४२.७ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले.
राज्यातील कमाल तापमान
- मुंबई(कुलाबा)-३२.६
- सांताक्रुझ-३६.९
- रत्नागिरी-३३.२
- पुणे-३९.०
- जळगाव-४२.६
- कोल्हापूर-३९.५
- महाबळेश्वर-३३.१
- नाशिक-३९.१
- सांगली-४०.४
- सातारा-३८.५
- नागपूर-४०.०
Join Our WhatsApp Community