राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून अनेक राजकीय भूकंप झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण हादरवून टाकणारी घडामोड समोर येत आहे. एमआयमचे खासदार इम्तियाज जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री राजेश टोपे यांच्यात युतीची चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी एमआयएम सोबत जाणार का, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
एमआयएमचे खासदार जलील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यात काही दिवसांपूर्वी भेट झाली. या भेटीत देशातून भाजपला पराभूत करण्यासाठी आमच्यासोबत या, अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.
का दिली ऑफर?
एमआयएम कुठेही निवडणुका लढते तेव्हा ती भाजपची बी टीम असल्याची टीका कायम एमआयएमवर करण्यात येते. ही टीका आपल्याला अमान्य आहे. त्यामुळे आता आम्ही तुमच्यासोबतही युती करायला तयार आहोत, अशी ऑफर आपण टोपे यांना दिल्याचे जलील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
शिवसेनेच्या पचनी पडणार का?
एमआयएमला सोबत घेणे कुणालाच नको असते, पण मुस्लिम मते सर्वांना हवी आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जर का वाटत असेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असेही जलील या मुलाखतीत म्हणाले आहेत. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत आहे. शिवसेनेची कायमंच एमआयएमच्या विरोधात भूमिका राहिली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने एमआयएमची ही ऑफर स्विकारली तर शिवसेना यावर नेमकी काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community