राजकारणात यशस्वी होऊन आज मंत्री झालो असलो, तरी विद्यार्थी दशेत राजकारणाशी माझा सुतराम संबंध नव्हता. शालेय जीवनात सामान्य विद्यार्थी असलो, तरी माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडण-घडणीत ‘बालमोहन विद्यामंदिर’चा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी केले. शिक्षण महर्षी तीर्थस्वरूप दादासाहेब रेगे यांच्या स्मरणार्थ ‘बालमोहन विद्यामंदिर’ शाळेच्या शनिवारी 19 मार्च रोजी आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
या दिग्गजांनी साधला संवाद
मुंबईतील दादर परिसरामधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात आयोजित या कार्यक्रमात ‘बालमोहन विद्यामंदिर’चे माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रात नावलौकिक कमावलेले 14 दिग्गजांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर जयंत पाटील यांच्यासह हेमंत गोखले, सुचेता भिडे-चापेकर, स्क्वा. लीडर प्रकाश पंत, जयराज जयंत साळगावकर , डॉ. प्रसाद मोडक, डॉ. अनिरूद्ध पंडित, विजय केंकरे, पद्मश्री पद्मजा फेणाणी, श्रीराम दांडेकर -डॉ. अनिता बापट, प्रवीण ठिपसे , चेतन रायकर, संदीप पाटील उपस्थित होते.
( हेही वाचा: आता पाच नाही तर ‘इतक्या’ वर्षांत तुम्ही होणार पदवीधर! )
शिक्षकांमुळे व्यक्तिमत्वाला सकारात्मक पैलू पडले
याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, माझे वडील राजकारणात असले तरी आमच्या घरात राजकारण दाराच्या चौकटीबाहेर असायचे. आमच्या वडिलांनी कधी राजकारणाचा घरात प्रवेश होऊ दिला नाही. त्यामुळे बालवयापासून आपण कोणी वेगळे आहोत असे वाटलेच नाही, किंबहुना वडिलांच्या संस्काराने तसे वाटू दिले नाही. मला आणि माझ्या भावंडांनादेखील बाहेर फारसे कुणी पुढाऱ्याची मुले म्हणून ओळखत नव्हते. माझा राजकारण प्रवेशदेखील वडिलांच्या पश्चातच झाल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे शाळेत असताना लंगडी खेळणे, उंचीचा फायदा घेऊन अधिकाधिक गडी बाद करणे, शाळेच्या मधल्या सुटीत शिवाजी पार्कवर जाऊन मनसोक्त क्रिकेट खेळणे असे विद्यार्थी दशेतील उपक्रम होते. शाळेतील त्यावेळच्या शिक्षीका डेरे बाईंनी अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्यांची शिकवण, मार्गदर्शन यामुळे व्यक्तिमत्वाला सकारात्मक पैलु पडल्याचे पाटील यांनी सांगितले.
मान्यवरांनी व्यक्त केले विचार
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजनाची भूमिका विषद करताना आनंद लिमये म्हणाले की, ‘बालमोहन विद्यामंदिर’मधून 1972 साली मॅट्रीक झालेल्या विद्यार्थ्यांच्या तुकडीला यंदा 50 वर्षे पूर्ण झाली. शिक्षण महर्षी तीर्थस्वरूप दादासाहेब रेगे यांच्यावर सर्व विद्यार्थ्यांचे प्रेम आणि जिव्हाळा अधिक होता. त्यामुळे 19 मार्च रोजी त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. विशेष म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी स्वतः खर्च उचलून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी इतर मान्यवरांनी देखील विषयानुरूप आणि समयोचित विचार व्यक्त केलेत. या गप्पाष्टकाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री स्पृहा जोशी आणि आभारप्रदर्शन डॉ. शुभदा काणे यांनी केले.
Join Our WhatsApp Community