सोमवार, २१ मार्च फाल्गुन कृ.प. ३ नुसार शिवजयंती तिथीनुसार साजरी होत आहे, मात्र सरकारकडून साजरी होत नाही. हा विषय भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडला. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वतः तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी कार्यक्रमाला गेले आहेत. त्यावर आम्ही अधिकाऱ्यांना विचारले, तेव्हा अधिकारी मात्र शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी रोजी झाला, म्हणून आम्ही तिथी मान्य करत नाही, असे म्हणत आहेत, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या जयंतीवर मुख्यमंत्री आणि प्रशासन यांच्यातील मतभेद मांडले.
विधिमंडळात शिवरायांचा फोटो ठेवण्याची मागणी
सोमवार, २१ मार्च रोजी सगळीकडे तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे. जेव्हा एखादी गोष्ट नंतर लक्षात येते, तेव्हा त्यात सुधारणा करता येऊ शकते. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की, शिवजयंती तिथीनुसार करायची, असे म्हणतात. त्यानुसार काँग्रेस, भाजप, समाजवादी पक्ष हे तिथीनुसार साजरी करतात, मग याला सरकारचा का आक्षेप आहे? सरकारने किमान विधिमंडळात शिवरायांचा फोटो ठेवावा आणि त्यांना अभिवादन करावे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
शासकीय रेकॉर्डवर शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी रोजीच! – उपमुख्यमंत्री
आजवर शिवरायांच्या तिथीनुसार शिवजयंतीच्या दिवशी कधीही विधिमंडळात फोटो लावला नव्हता, शिवराय हे दैवत आहेत हे त्रिवार सत्य आहे. स्व. रामकृष्ण मोरे हे एका खात्याचे मंत्री होते, तेव्हा त्यांनी सर्व पुराव्यानिशी शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारीला झाला, असे रेकॉर्डवर आणले होते, त्यानुसार सरकारकडून १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून तिथीनुसार शिवजयंती साजरी करत आहेत, आदित्य ठाकरे हेही शिवरायांना अभिवादन करण्यासाठी गेले आहेत, कुणालाही तिथीनुसार साजरी करायची असेल, तर ते साजरी करू शकतात. अधिकारी वर्गाला १९ फेब्रुवारी तारीख दिली आहे, त्याप्रमाणे सुटी दिली जाते. तिथीनुसारही शिवजयंती साजरी होत आहे, त्यादिवशी आम्ही काम करत आहे. शिवराय कामालाही महत्व देत असत, असेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ज्यांना कुणाला तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची असेल त्यांनी विधिमंडळाच्या प्रांगणात शिवरायांचा पुतळा आहे, तिथे जाऊन शिवरायांना पुष्पहार अर्पण करावा, असेही अजित पवार म्हणाले.
विधीमंडळात तिथीनुसार शिवजयंती साजरी झाली! – सुनील प्रभू
यानंतर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू म्हणाले की, आज तिथीनुसार जयंती साजरी केली जात आहे. विधिमंडळाच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या परिसरातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी केली, त्यावरून ही शासकीय शिवजयंतीच साजरी केल्याप्रमाणे आहे, असे प्रभू म्हणाले.
Join Our WhatsApp Community