सरकार ठाकरेंचे, फायदा मात्र राष्ट्रवादीचा! कोणी दिला घरचा आहेर?

84

ठाकरे सरकारचे आता तिसरे वर्ष सुरू आहे. 1995 ला सेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले, पण त्यांच्या हयातीत पूर्ण झाले नाही. त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सेनेने भाजपचा हात सोडून चक्क पारंपरिक राजकीय विरोधक काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सोबत महाआघाडी करून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. मात्र सत्तेची दोन वर्षे भोगल्यावर सत्तेचा खरा फायदा सेनेला झालाच नाही, तो राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आहे, अशी कबुली खुद्द शिवसेनेचे आजी-माजी आमदार आणि नेते करू लागले आहेत.

भाजपसोबतच्या युतीमध्ये शिवसेना पंचवीस वर्षे सडली, अशी टीका करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेतला आणि महाविकास आघाडीबरोबर संसार थाटला. राज्यातील सत्तेचा सोपान हाती घेतले. पण गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेची गोची होत आहे का? असा प्रश्न सेना नेत्यांना पडू लागला आहे.

काय म्हणाले गजानन कीर्तिकर?

रत्नागिरी येथे बोलताना शिवसेना नेते गजानन कीर्तिकर म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला ठाकरे सरकार म्हटले जाते, पण खरा फायदा तर पवार सरकारलाच मिळत आहे. माझी रत्नागिरीतून कुठलीही निवडणूक लढण्याची इच्छा नाही. मुंबईमध्ये आम्हाला सीएम आणि नगरविकास फंडातून भरपूर निधी मिळतो. ग्रामीण भागांतील लोकप्रतिनिधींना गावांत बरीच कामे करावी लागतात. मी माझ्याकडून शक्य तेवढी मदत करत असतो. कीर्तिकर म्हणाले, सरकारकडून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. मी येथे राष्ट्रवादीचे नाव घेईन. या सरकारला आपण उद्धव ठाकरे सरकार म्हणून ओळखतो, पण खरा फायदा पवार सरकारला होत आहे. यामुळे सरकारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होत आहे, असेही कीर्तिकर म्हणाले.

(हेही वाचा चित्रा वाघ सापडल्या चौकशीच्या फे-यात)

काय म्हणाले राजेश क्षीरसागर?

महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या वाट्याला फारसे काही मिळत नाही, अशी तक्रार आमदारांची आहे. मध्यंतरी शिवसेनेचे 25 नाराज आमदार निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. हे प्रकरण शांत होत नाही, तोपर्यंत कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रह धरला आणि आपली तीव्र नाराजीही जाहीर केली. शिवसेना-भाजप युती असताना कोल्हापूरची जागा शिवसेनेकडे होती. परंतु गेल्यावेळी या जागेवर काँग्रेसचा विजय झाला. त्यामुळे महाविकास आघाडीत यंदा ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. याआधी पंढरपूर आणि देगलूर या दोन्ही ठिकाणी शिवसेनेची अशीच अडचण झाली होती. एकीकडे संघटनात्मक पातळीवर ही कोंडी होत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे जवळपास डझनभर नेते चौकशीच्या फेऱ्यात आहेत. अनिल परब, संजय राऊत, रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, किशोरी पेडणेकर, राहुल कनाल यांच्यासारखी दिग्गज नेत्यांची फौज अडचणीत आहे. एकीकडे सरकारी गाडा हाकत असताना उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक पातळीवर पकड कमी होत आहे, असा आरोप होत आहे. त्यात आता निधीवरुन आमदारांची नाराजी महाविकास आघाडीत निवडणूक लढता येत नसल्यामुळे होणारी घुसमट ही जाहीरपणे बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसाठी लढाई सोपी नसेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.