मुंबईतील माटुंगा पश्चिम रेल्वे वसाहत, सेनापती बापट मार्ग, दादर हिंदु कॉलनी, दादर टी.टी आदी भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबले जात असल्याने यावर उपाययोजना म्हणून धारावीमध्ये पंपिंग स्टेशन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या पंपिंग स्टेशनकरता पूर्वी पिवळा बंगला येथील पातमुखाची जागा निश्चित केली होती. परंतु याला स्थानिक कोळीवाड्यातील रहिवाशांनी विरोध केल्यानंतर महापालिकेने या पंपिंग स्टेशनची जागाच बदलली आहे. त्यामुळे पिवळा बंगला ऐवजी टी जंक्शन जवळील पातमुखांच्या जागेवर पूर नियंत्रण दरवाजे बनवून तिथे पपिंग स्टेशन बनवण्याचा निश्चित केले आहे. त्यानुसार या पंपिंग स्टेशनच्या प्रस्तावाला यापूर्वीच स्थायी समितीची मान्यता मिळाल्याने याचे काम लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पावसाळ्यात माटुंगा पश्चिमससह दादर पूर्व भागातील तुंबणाऱ्या पाण्याची समस्या मिटण्याची शक्यता आहे.
खर्चिंक बाब लक्षात घेता पंपिंग स्टेशनचा निर्णय
मुंबईत पावसाळ्यात होणारी तुंबई रोखण्यासाठी ब्रिमस्टोवॅड प्रकल्प व बिगर ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतंर्गत नाल्यांच्या रुंदीकरणाची तसेच पंपिंग स्टेशनची कामे करण्यात येत आहेत. त्यातील काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही प्रगतीपथावर आहेत. तर काही प्रस्तावित कामांना आता गती देण्यात येत आहे. त्यापैकी धारावी येथील पंपिंग स्टेशन एक आहे. माटुंगा पश्चिम येथील रेल्वे स्थानक परिसरात म्हणजे सेनापती बापट मार्ग, रेल्वे वसाहत व येथील कमला रामन नगरसह हिंदु कॉलनी परिसर आणि दादर टी.टी परिसर हा पाण्याखाली जात असल्याने यावर उपाययोजना म्हणून सल्लागाराने धारावी पंपिंग स्टेशनचे पंपिंग स्टेशनची शिफारस केली होती. यापूर्वी दादर-धारावी नाल्याचे रुंदीकरण प्रस्तावित होते. परंतु या नाल्याच्या रुंदीकरणात मोठ्याप्रमाणात कमला रामन नगर, आझाद नगर येथील शेकडो कुटुंबे बाधित होत असल्याने ही खर्चिंक बाब लक्षात घेता पंपिंग स्टेशनचा निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचा – उध्दव ठाकरे हे राज्यातील ‘त्या’ मुख्यमंत्र्यांच्या पंक्तीत!)
यासाठी प्रारंभी धारावी पिवळा बंगला पातमुख येथील गेट व पंपाचे काम करण्यात येणार होते. परंतु संत रोहिदास मार्ग व शीव माहिम लिंक रोडच्या बाजूने बनवण्यात येणाऱ्या पर्जन्य जलवाहिनी पिवळा बंगला जवळील खाडीला जोडण्यास धारावी कोळीवाडा आणि धारावी कोळी जमात संघाच्या रहिवाशांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पंपिंग स्टेशनची जागा बदलण्यात आल्याची माहिती पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये ही कंपनी पात्र
त्यामुळे नवीन पर्जन्य जलपेटीका वाहिनी धारावी टी जंक्शन जवळील खाडीला जोडण्याची मागणी झाल्याने त्याठिकाणी पंपिंग स्टेशन बनवण्यात येत आहे. यासाठी महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये मिशिगन इंजिनिअर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली. या पंपिंग स्टेशनकरता सुमारे ७० कोटी रुपये व विविध करांसह ८० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यामध्ये पंपिंग स्टेशनच्या बांधकामासाठी ५७ कोटी रुपये आणि सुमारे १३ कोटी रुपये हे सात वर्षांच्या देखभालीसाठी खर्च केले जाणार आहे. या पंपिंग स्टेशनचे काम पावसाळ्यासह आठ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे हे काम एप्रिलमध्ये हे काम सुरु झाल्यास नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यामुळे याचा लाभ येत्या पावसाळ्यात होणार नसला तरी त्यापुढील पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील रहिवाशांची पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यापासून सुटका होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
Join Our WhatsApp Community