मराठी पाट्या : राज्य सरकारला पडला देवदेवतांचा विसर!

74

दुकानांच्या नावाच्या पाट्या मराठीतून करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता दोन महिन्यांनंतर अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यामध्ये दुकानांच्या पाट्या ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहीणे बंधनकारक केले असून कोणत्याही मद्यविक्री तसेच पुरवल्या जाणाऱ्या दुकान तथा बारचे नाव महान व्यक्ती किंवा गडकिल्ल्यांचे नाव नसावे असे कडक निर्बंध घालण्यात आले आहे. मात्र, देवदेवतांची नावे दारुची दुकाने व बारला देण्यात येवू नये या महापालिकेच्या ठरावाचा सरकारला विसर पडला.

( हेही वाचा : कोळी बांधवांच्या विरोधामुळे धारावीतील पंपिंग स्टेशनची जागा बदलली )

सरकारला विसर

मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठी भाषेत सुवाच्य अक्षरात आणि ठळक लावण्याचा निर्णय राज्य कॅबिनेट बैठकीत १२ जानेवारी रोजी घेण्यात आला. परंतु दोन महिने झाले तरी याबाबतचा शासन आदेश मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांना जारी करण्यात आले नव्हते. त्यामुळे याची अंमलबजावणी महापालिकांना करता येत नव्हती. परंतु याचा अध्यादेश जारी करण्यात आला असून त्यात महान व्यक्तीची नावे तसेच गड किल्ल्यांची नावे दारूचे दुकान किंवा बार यांना देण्यात येऊ नये असे म्हटले आहे.

जारी करण्यात आलेल्या अध्यादेशमध्ये प्रत्येक आस्थापना, दुकानांचा फलक हा देवनागरी लिपितील मराठी भाषेमध्ये असावा असे म्हटले आहे. पण देवनागरी लिपितील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलकही असू शकतील. परंतु मराठी भाषेतील अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहिणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा टंक आकार, इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही असेही या अध्यादेशात म्हटले आहे.

भाजपची मागणी

मुंबईतील रेस्ट्रोबार, पब, डिस्को डान्सबार तसेच दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. दुकान व विविध आस्थापना यांना परवाना (लायसन्स) देण्यात येणार्‍या महापालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करून देवदेवतांची नावे रेस्ट्रोबार, पब, डिस्को डान्सबार तसेच दारुची दुकाने यांना देण्यात येवू नये याकरता नियमात बदल करावा आणि अशाप्रकारे देण्यात आलेल्या देवदेवतांच्या नावांच्या पाट्या काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे जोगेश्वरी पूर्व येथील नगरसेवक पंकज यादव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली होती, त्यानुसार महापालिकेत ठरावही करण्यात आला होता. परंतु याबाबतचा अधिसूचना जारी करताना देवदेवतांची नावे ठेवण्यावर निर्बंध घालण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट महान व्यक्ती व गडकिल्ल्यांची नावे ठेवण्यावर निर्बंध घालण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.