अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेवर मरगळ आली आहे. प्रत्येक जण गटातटात विखुरला आहे. भाजपप्रणित राणा दाम्पत्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शिंतोडे उडवित असताना येथील शिवसैनिक मूग गिळून राहतो. राणा विरोधात कोणीच का बोलत नाही, असा सवाल करीत शिवसेना लढवय्या संघटना असून पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची हकालपट्टी करू, असा सज्जड इशारा शिवसेना नेते खासदार गजानन कीर्तीकर यांनी दिला. यावेळी कीर्तीकर यांनी जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेतही दिले.
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान टोचले
शिवसेनेच्यावतीने विदर्भात शिवसंवाद दौरा आयोजित केला होता. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप बडनेरा मार्गावरील महेंद्र लॉन येथे जिल्ह्यातील महत्त्वाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाला. या बैठकीत खासदार गजानन कीर्तीकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. खासदार कीर्तीकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या आठ निरीक्षकांचे पथक चार दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी अमरावतीत ठाण मांडून होती. निरीक्षकांमध्ये पराग बने, मोकळ व अन्य सेना नेत्यांचा समावेश होता. शिवसेनेच्यावतीने शिवसंवाद दौरा हा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. परंतु गुरूवारी दौऱ्याच्या समारोपाला खासदार गजानन कीर्तीकर यांच्यासमोर स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. यावेळी खासदार कीर्तीकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना एकेकाळी अमरावतीतील लढवय्य शिवसेना आता गप्प का, असा सवाल उपस्थित केला.
(हेही वाचा खासगी रुग्णालयांतील गरिबांच्या आरक्षित खाटा २ टक्क्यांनी वाढणार)
एकाच दिवशी दोन मिरवणुका काढणे ही शोकांतिका
शिवसेनेतील दुफळीबाबत बोलताना त्यांनी शहरातील शिवसेनेच्यावतीने काढण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या मिरवणुकीवर कटाक्ष टाकला. शिवसेनेच्यावतीने एकाच दिवशी दोन मिरवणुका काढणे ही शोकांतिका असल्याचे कीर्तीकर म्हणाले. एकीकडे राज्यातील महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष जिल्ह्यात वरचढ ठरत असताना राज्याचा मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेची जिल्ह्यात वाताहत होत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी खासदार कीर्तीकर यांनी स्व. संजय बंड यांच्या कार्याची आवर्जून आठवण करून दिली. जिल्ह्यातील शिवसेनेत हीच स्थिती राहिल्यास कार्यकारिणीत फेरबदलाचे संकेत त्यांनी दिले. तसेच पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांची हकालपट्टी करू, असा इशाराही कीर्तीकर यांनी यावेळी दिला.
निरीक्षकांसमोरच एकमेकांवर ताशेरे
बडनेरा मार्गावरील महेंद्र लॉन येथे शिवसंवाद दौऱ्याच्या समारोपीय कार्यक्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना एकमेकांवर ताशेरे ओढले. एकमेकांचे उट्टे काढताना आता तुम्हीच लक्ष घाला, असे शिवसेना नेतांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून सांगितले. यातूनच शिवसेनेतील दुफळी समोर आली.
Join Our WhatsApp Community