सोमय्यांचा ‘हातोडा’ परबांच्या रिसॉर्टवर भारी पडणार का?

99

भाजप नेते किरीट सोमय्या भलामोठा हातोडा घेऊन दापोलीच्या दिशेने रवाना झाल्याचे शनिवारी सकाळी पाहायला मिळाले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट हे बेकायदेशीर असून ते रिसॉर्ट तोडणारच असा चंग सोमय्यांनी बांधल्याने आता किरीट सोमय्यांचा हातोडा अनिल परब यांच्या रिसॉर्टवर भारी पडणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.  या पार्श्वभूमीवर चलो दापोलीचा नारा सोमय्यांनी दिला तर त्यांच्या हाती प्रतिकात्मक स्वरूपाचा मोठा हातोडा असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे दापोलीत कोर्लईची पुनरावृत्ती होणार का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

सोमय्या हातोडा घेऊन दापोलीला रवाना 

दरम्यान, अनिल परब यांचा दापोलीतील मुरुडमध्ये असणाऱ्या रिसॉर्टचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. किरीट सोमय्या यांनी शनिवारी आपण अनिल परबांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर आज सोमय्या सव्वा सात वाजेच्या सुमारास मुंबईतील आपल्या घरापासून दापोलीला रवाना झाले आहेत. यावेळी त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांची गर्दी होती. सोमय्या यांच्या दापोली दौऱ्यात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते त्यांचे स्वागत करत त्यांच्या या दौऱ्यात सामील होणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी दिली आहे. यानंतर सोमय्यांना रोखण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सज्ज झाले असून त्यांना इशारा दिला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दापोलीतील वातावरण तापलं असून जोरदार शक्तिप्रदर्शनाची शक्यता आहे.

(हेही वाचा – मुंबई सेंट्रल,महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसरात आता तुंबणार नाही पाणी )

काय म्हणाले सोमय्या?

राज्याच्या जनतेसाठीचा हा महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहासारखाच सत्याग्रह असल्याचे सोमय्यांनी म्हटले आहे. आज तर अनिल परब यांचा बेकायदेशीर वसुलीच्या पैशांनी बांधलेल्या रेसॉर्टवर हातोडा पडणार आहे. पण त्यानंतर डर्टी डझन आहेत, त्यावर पण हातोडा पडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. साडेबारा कोटी जनतेचा हा हातोडा असून मिलींद नार्वेकरांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडूयात असे सोमय्या म्हणालेत. आम्ही जनतेची भाषा बोलतो. जनतेची ताकद दाखवायला मी दापोलीला जात आहे. हा हातोडा साडेबारा जनतेच्या सत्याचा आग्रह असल्याचे सोमय्या म्हणाले. यापुढे त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. हा हातोडा ठाकरे सरकारमधील जे घोटाळेबाज, अनाधिकृत बांधकाम, वसुलीचा पैसा घेतायेत त्या माफियांच्या विरोधात असल्याचे सोमय्या म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत काय भाषण करतात की, माझा माणूस अनाधिकृत बांधकाम करणार, हे काय मुख्यमंत्री आहेत काय? असेही सोमय्या यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टीका करत नाही तर घाबरून स्वतःचा बचाव करत आहेत, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.