बापरे! साखर 290 रूपये तर तांदूळ 500 रुपये किलो

106

देशभरात पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या वाढत्या किमतीने सामान्य नागरिकांचे जगणं कठीण केले आहे. तर असाही एक देश आहे, ज्या ठिकाणी साखर तब्बल २९० रूपये तर तांदूळ ५०० रुपये किलोने विकला जात आहे आणि तो देश आहे श्रीलंका. श्रीलंका आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे. वेगवेगळ्या विकास योजना आणि संरक्षण योजनांसाठी चीनकडून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतल्यामुळे दोन्ही देशांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. वाढती महागाई आणि कोसळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंकेचे चलनाचे अवमूल्यन सुरू असल्याने श्रीलंकेत प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे देशासमोर भूकबळीचे संकट उभे राहिले आहे. पेट्रोल-डिझेलची इतकी टंचाई निर्माण झाली आहे की, पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

आर्थिक संकटामागे हे आहे प्रमुख कारण

श्रीलंका प्रथमच एवढ्या भीषण आर्थिक संकटात सापडला आहे. श्रीलंकेतील खाद्य क्षेत्रातील महागाई २५.७ टक्क्यांवर पोहोचली असून एक कप चहाची किंमत १०० रुपये झाली आहे. साखर २९० रुपये किलो, तर तांदूळ ५०० रुपये किलो झाले आहे. ४०० ग्रॅम दूध पावडरचा दर ७९० रुपये झाला. श्रीलंकेच्या आर्थिक संकटामागे डॉलरची टंचाई हे प्रमुख कारण आहे. श्रीलंका तेल, अन्न, कागद, साखर, डाळी, औषधी इत्यादी सर्वच आवश्यक वस्तूंची आयात करतो; पण सध्या या देशाकडे आयातीसाठी विदेशी चलनच उपलब्ध नाही. मार्चमध्ये श्रीलंका सरकारकडे फक्त २.३६ अब्ज डॉलर शिल्लक आहेत. परीक्षेचे पेपर छापण्यासाठीही सरकारकडे पैसे नसल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षाच रद्द केल्याचे समोर आले होते.

(हेही वाचा – ‘या’ अफवेमुळं पेट्रोल पंपावर गर्दी; कारण ऐकून पंप चालक हैराण )

पेट्रोल २५४ तर डिझेल १७६ रुपये लिटर

समोर आलेल्या वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वी येथील पेट्रोलचे दर ५० रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर ७५ रुपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. आता तेथे पेट्रोल २५४ रुपये लिटर तर डिझेल १७६ रुपये लिटर झाले आहे. पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याच्या प्रयत्नात अनेक लोकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्यात आले आहे. तर कच्च्या तेलाच्या अनुपलब्धतेमुळे सरकारला आपली एकमात्र रिफायनरीही बंद करावी लागली आहे. १२.५ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात १.३५९ रुपयांची वाढ झाली आहे. आता सिलिंडरची किंमत ४,११९ रुपये झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.