नवी दिल्ली सरकार आगामी पाच वर्षात 20 लाख नोकऱ्या देणार आहे. दिल्लीचे अर्थमंत्री मनीष सिसोदिया यांनी शनिवारी 2022-23 आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करताना ही घोषणा केली. दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प 75 हजार 800 कोटी रुपयांचा असून त्याला रोजगार बजेट असे नाव देण्यात आले आहे.
20 लाख नोकऱ्या
यावेळी सिसोदिया म्हणाले की, गेल्या वर्षी आम्ही देशभक्ती अर्थसंकल्प सादर केला होता. तर यंदा रोजगार बजेट आणले आहे. त्यानंतर्गत दिल्लीकरांना नोकऱ्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यंदा आमचा आठवा अर्थसंकल्प असून यापूर्वीच्या 7 बजेटच्या माध्यमातून आम्ही दिल्लीतील शाळा चांगल्या झाल्या आहेत, लोकांना विजेचे शून्य बिल येत आहे, मेट्रोचा विस्तार झाला आहे, सुविधा फेस लेस झाल्या आहेत, आता लोकांना सरकारी कार्यालयात खेपा माराव्या लागत नाहीत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. गेल्या सात वर्षात 1.8 लाख सरकारी रोजगारात 51307 सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. विद्यापीठात 2500, हॉस्पिटलमध्ये 3 हजार रोजगार, गेस्ट टीचर म्हणून 25, सॅनिटेशन अँड सिक्युरिटीमद्ये 50 हजार रोजगार देण्यात आले. आता दिल्लीत लोक सरकारी कार्यालयात फेऱ्या मारत नाहीत, असे मनीष सिसोदिया यांनी सांगितले. तसेच नवी दिल्ली सरकार आगामी पाच वर्षात 20 लाख नोकऱ्या देणार आहे, अशी घोषणाही त्यांनी केली आहे.
( हेही वाचा : या वीकेंडला घरीच बसा! )
शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन
रोजगार बजेट या अर्थसंकल्पात दिल्ली फिल्म पॉलिसीसाठी काम करण्यात आलं आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. तसेच दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. रिटेल सेक्टर, फूड अँड बेव्हरेज, ट्रॅव्हल अँड टुरिझम, लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन, एंटरटेन्मेंट, बांधकाम श्रेत्र, रिअल इस्टेट आणि ग्रीन एनर्जीमध्ये रोजगार देण्याची दिल्ली सरकारची योजना आहे. यावेळी सिसोदिया यांनी अमेरिकेचं उदाहरण दिलं. आपण तरुणांना रोजगार दिले तर ते खर्चही करतील. त्यामुळे खप वाढेल आणि विकासही होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच रिटेल मार्केटला प्रोत्साहन देण्यासाठी दिल्लीत शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे खरेदी विक्री वाढेल. होलसेल मार्केटलाही प्रोत्साहित करण्यासाठी होलसेल शॉपिंग फेस्टिव्हलचंही आयोजन केलं जाणार आहे. स्थानिक बाजारात दुकानदारांना ग्राहकांना जोडून घेण्यासाठी पोर्टलची सुरुवात करण्यात येणार आहे. गांधी नगर कपडा मार्केटला दिल्ली गार्मेंट हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे. दिल्लीच्या फूड हबचा पुनर्विकास करण्यात येईल. तसेच क्लाऊड किचनची निर्मितीही केली जाणार आहे.
Join Our WhatsApp Community