एप्रिल-मे महिना आला की, आतुरता लागते कोकणातील आंब्याची! कोकणातील हापूस आंबा हे सर्वांचे आवडते फळ त्यामुळे आंब्यांच्या पेट्यांना बाजारात मोठी मागणी असते. परंतु सततच्या बदलणाऱ्या निसर्ग चक्रामुळे यंदा कोकणातील हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. हापूस आंब्याचा हंगाम उशिरा सुरू होत आहे. सद्य:स्थितीत घाऊक आणि किरकोळ बाजारात हापूसची मोजकीच आवक होत आहे.
( हेही वाचा : उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ! )
15 एप्रिलनंतर हापूसची आवक वाढणार
अजूनही आंब्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेले नाहीत. भाव आवाक्यात येण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. बाजारात साधारणतः 15 एप्रिलनंतर हापूसची आवक वाढणार असल्याचा अंदाज आहे. बाजारातील आवक वाढल्यानंतरच काही प्रमाणात भाव कमी होतील. तोपर्यंत मात्र हापूसचे भाव जास्तच असणार आहेत. प्रारंभीच्या काळात मोहर मोठ्या प्रमाणात गळाला, असे मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी सांगितले.
ग्राहकांची फसवणूक
बाजारात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्याची देवगड, रत्नागिरी येथून आवक होते. त्याशिवाय केरळ, कर्नाटकातूनही आंबा येतो. मात्र, दोघांच्या चव आणि सालीमध्ये फरक आहे. कोकणातील हापूस आंबा रसाळ आणि चवीस चांगला असतो. त्यामुळे कोकणातील आंब्यांना सर्वाधिक मागणी असते. म्हणूनच या आंब्याच्या किंमतीही जास्त असतात. याचा फायदा घेत व्यापारी, विक्रेते नागरिकांची फसवणूक करतात. बाजारपेठांमध्ये आंब्यांची अदलाबदल करून विक्री केली जाते. हंगामाच्या सुरवातीला असा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे बाजार समिती यापुढे काय कारवाई करते हे महत्वाचे ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community