मागील ४ महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचा संप सुरुच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत यावर निवेदन करताना, संपकरी एसटी कामगार जर ३१ मार्च २०२२ पर्यंत कामावर रुजू झाले, तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही, असे म्हटले आहे. त्यानंतर महामंडळाने लागेच परिपत्रक काढले. त्यामध्ये बडतर्फ कामगारही सेवेत हजर झाले, तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार नाही, असे म्हटले आहे.
१०,२७५ बडतर्फ कामगारांना संधी
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सहभागी झालेल्या १०,२७५ कामगारांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे हे कामगार जे संपकरी कामगार सेवेत सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांच्यावर दबाव आणत होते. कारण बडतर्फ कामगारांना सेवेत सहभागी होता येणार नाही, असा महामंडळाचा निर्णय होता. ही चिंतेची बाब बनली होती. परंतु आता महामंडळाच्या परिपत्रकामुळे बडतर्फ कामगारांच्या सेवेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पत्रकानुसार जे बडतर्फ कामगार ३१ मार्च २०२२ पर्यंत सेवेत सहभागी झाले, तर त्यांची सेवाज्येष्ठता कमी केली जाणार नाही.
(हेही वाचा बुरखा घातला म्हणून विरोध केला, तर हॉटेलच पाडले बंद!)
परिपत्रकामुळे संपकरी कामगारांना दिलासा
दरम्यान संपकरी कामगार ज्यांना पुन्हा रुजू व्हायचे आहे, त्यांच्यावर या बडतर्फ कामगारांप्रमाणे कारवाई केली जाणार, त्यांना कायमचे सेवेतून काढले जाईल, अशी भीती दाखवून त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्यापासून थांबवले जात होते, मात्र आता या परिपत्रकामुळे संपकरी कामगारांना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. याची शास्वती मिळाली आहे, त्यामुळे त्यांना एसटीच्या सेवेत पुन्हा रुजू होता येणार आहे, असे महामंडळाच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.
सेवासमाप्ती कामगारांना प्रतिनियुक्ती
अजूनही ५०,३७५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. महामंडळाने केलेल्या आवाहनानुसार काही कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले आहेत, तर २० हजारांहून अधिक कर्मचारी विविध प्रकारच्या कारवाईत अडकले आहेत. बदली, बडतर्फी, निलंबन, सेवा समाप्ती अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. सेवा समाप्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये रोजंदार गट अ कर्मचारी आहेत. ते महामंडळाच्या सेवेत नव्यानेच रुजू झाले होते. २५०० कर्मचारी रोजंदार ‘गट अ’चे असून, त्यातील जवळपास सगळेच संपात सहभागी झाले होते. दरम्यानच्या काळात काही जण कामावर हजर झाले आहेत. एकूण २०२९ जणांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या सर्वांना ३१ मार्चपर्यंत कामावर हजर होण्याची संधी दिली आहे. हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०२२ पासून पुनर्नियुक्ती दिली जाईल.
Join Our WhatsApp Community