अद्यापही एसटीचे 48 हजार 500 कर्मचारी संपावर आहेत. या संपामुळे आधीच एसटी तोट्यात आहे. त्यातच इंधनात सातत्याने दरवाढ होत आहे. राज्यात डिझेलने शंभरी पार केली आहे. डिझेलच्या घाऊक दरात मोठी वाढ झाल्यानंतर किरकोळ डिझेलमध्येही वाढ होत असल्याने, एसटी महामंडळाच्या अडचणींत वाढ झाली आहे. ही दरवाढ अशीच सुरू राहिल्यास एप्रिलपासून एसटी महामंडळाला इंधन खर्चापोटी अतिरिक्त शंभर कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. सध्याच्या महसुलाच्या तुलनेत हा खर्च सुमारे 65 टक्के आहे.
महामंडळाला फटका
आधीच एसटी कर्माचा-यांच्या संपामुळे एसटीचे उत्पन्न प्रचंड घटले आहे. संप अद्यापही मिटलेला नाही. त्यातच गाड्यांचे सुटे भाग, इंडियन ऑइल यांच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत किरकोळ डिझेलच्या दरात तब्बल 5 रुपयांची वाढ झाल्याने महामंडळाला सध्या रोज 15-16 लाख रुपये अतिरिक्त मोजावे लागत आहेत. सध्याच्या दरानुसार महामंडळाला दररोज रुपये 3 कोटी 30 लाख रुपये खर्च येतो. या हिशोबाने महामंडळाला एप्रिलमध्ये सुमारे 100 कोटी रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत.
( हेही वाचा: कोळशाच्या टंचाईमुळे आता नागरिकांना बसणार शाॅक! )
संप काही संपेना
परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतर, संपकरी कर्मचा-यांना कामावर परतण्यासाठी 31 मार्च म्हणजे गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. अद्याप 48 हजार 500 कर्मचारी संपावर ठाम आहेत.