गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा ताप उतरत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोना काळात लावण्यात आलेले कठोर निर्बंध आता शिथिल करण्यावर राज्य सरकारकडून विचार करण्यात येत आहे. याचबाबत गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता राज्य संपूर्णपणे मास्कमुक्त होणार का, अशा चर्चांना देखील उधाण आले आहे. परंतु याबाबत राज्य सरकारचा कुठलाही विचार नसल्याची माहिती नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता मंत्रीमंडळ बैठकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः टोलच्या दरांत मोठी वाढ! 1 एप्रिलपासून असे असणार नवीन दर)
नव्या नियमावलीची शक्यता
गुरुवारी दुपारी 4 वाजता मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसेच 1 एप्रिलपासून राज्यात नवी नियमावली जाहीर करण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शोभायात्रांना परवानगी मिळणार?
गुढीपाडव्याच्या निमित्ताने काढण्यात येणा-या शोभायात्रांना परवानगी द्यायची किंवा नाही, याबाबतही मंत्रीमंडळ बैठकीत विचारविनिमय होणार आहे. बैठकीनंतर रात्रीपर्यंत या संबंधीची नियमावली जाहीर करण्यात येईल, असे देखील अजित पवार यांनी सांगितले.
(हेही वाचाः कोळशाच्या टंचाईमुळे आता नागरिकांना बसणार शाॅक!)
मास्कमुक्तीबाबत काय म्हणाले टोपे?
राज्यातील निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी लोकांकडून वारंवार रेल्वे, बस, मॉल्स यासंबंधी निर्बंध शिथिल करण्याच्या मागण्या आल्या. त्यावर आता सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भआव वाढत असल्याने, मास्क मुक्तीचं धाडस करणं सध्यातरी शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणेच आपल्यासाठी हितकारक आहे. तूर्तास तरी संपूर्णपणे मास्क मुक्तीचा कसलाही विचार सरकारने केलेला नाही. अशी माहिती देखील त्यांनी दिली होती.
Join Our WhatsApp Community