उद्यानातही वाचा ‘चकटफू’

90

मुंबईतील उद्याने ही मनोरंजनाची ठिकाणे असली तरी आजच्या आभासी युगामध्ये तरुणांसह सर्वांमध्ये पुन्हा वाचनाची आवड जोपासली जावी याकरता मुंबई महापालिकेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एका उद्यानांमध्ये मोफत वाचनालयाची सुरुवात सामाजिक दायित्वातून(सीएसआर) करण्यात येत आहे. मोबाईल, टॅबलेट, संगणक व इतर गॅजेट्समुळे आभासी विश्वात हरवत चाललेल्या युवा पिढीला वाचनाची गोडी लावण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : एसटी संपावरील अल्टिमेटम संपणार, कारवाई अटळ! )

विविध उपक्रम

मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुव‍िधा देताना सीएसआरमधून अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. महानगरपालिकेच्या उद्यान व‍िभागाने देखील अलीकडच्या काळात सामाजिक दायित्वातून अनेक अभ‍िनव उपक्रम पूर्ण केले आहेत. प्रामुख्याने उद्यानांच्या रुपाने मुंबईच्‍या सुशोभिकरणास हातभार लावण्‍यात आला आहे. विव‍िध चौक, वाहतूक बेटे व रस्‍ते दुभाजक यांचे सुशोभिकरण, म‍ियावाकी पद्धतीने केलेली साडेचार लाखांपेक्षा अधिक वृक्ष लागवड अशा उपक्रमांचाही त्यात समावेश आहे. कोविड विषाणू संसर्ग स्थितीत नियंत्रणात आल्यानंतर उद्यानांकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे विरंगुळा आणि व्यायामाच्या सेवा-सुविधांपलीकडे जाऊन संगीतमय सकाळ, राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्र (एनसीपीए) यांच्या सहकार्याने आयोजित संगीतमय संध्‍या असे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात आहेत. अनेक कॉर्पोरेट कंपन्‍या, दानशूर व्‍यक्‍ती व संस्‍था अशा प्रकारच्‍या उपक्रमांकरिता स्‍वारस्‍य दाखव‍ित असतात.

२४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालय

मुंबईतील उद्यांनामध्‍ये काही कंपन्यांनी सीएसआरमधून मोफत वाचनालयाची सुव‍िधा उपलब्‍ध करण्‍याबाबत स्‍वारस्‍य दाखव‍िले आहे. या संस्‍था पुस्‍तके, ग्रंथ आणि इतर वाचन साहित्‍य विनामूल्‍य उपलब्‍ध करण्‍यास इच्‍छुक आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक प्रशासकीय विभागात एक याप्रमाणे मुंबईतील २४ उद्यानांमध्ये मोफत वाचनालय सुरु करण्याचा निर्णय घेतला असल्याचे अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केले.

उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क अशा प्रकारच्‍या महानगरपालिकेच्या ताब्‍यात असलेल्‍या भूखंडांवर बांधलेली वास्तू , गजेबो उपलब्‍ध आहेत. अशा उद्याने आणि जागांमध्ये योग्य अशा ठिकाणी छोटेखानी कपाट ठेऊन त्‍यामध्‍ये वाचनासाठी पुस्‍तके, ग्रंथ ठेवण्यात येत आहेत. उद्यानास भेट देणाऱया नागरिकांना सदर वाचन साहित्‍य मोफतपणे वाचणे शक्‍य होईल. वाचन झाल्यानंतर ते साहित्य उद्यानांमधील कपाटांमध्येच परत ठेवले जाईल, असे या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत बोलतांना उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी स्पष्ट केले. आजच्या तंत्रज्ञान युगात प्रत्यक्ष वाचन साहित्याऐवजी मोबाईल, टॅबलेट, संगणक इत्यादी उपकरणांच्‍या आभासी व‍िश्‍वात युवा प‍िढी हरवत चालली आहे. त्यांच्यात वाचनाची गोडी न‍िर्माण करून त्यांना तणावमुक्‍त होता यावे, त्यासोबतच त्‍यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे लुप्‍त होत चाललेल्‍या वाचनालय संस्‍कृतीस संजीवनी प्राप्‍त करून देण्‍याकरीता हा उपक्रम योगदान देऊ शकेल,असे ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.