मार्चमध्ये आलेली उष्णतेची लाट धोकादायक; तापमानात चंद्रपूर जगात पहिल्या स्थानी

142

राजस्थानातून वाहणा-या उष्ण वा-यांच्या प्रभावामुळे देशातील उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात आलेल्या उष्णतेच्या लाटेने मार्च महिन्यातील रॅकोर्ड्स नोंदवले. शुक्रवारी विदर्भातील चंद्रपूर हे जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचले. ४३.६ अंश सेल्सिअस हे चंद्रपूरात नोंदवलेले कमाल तापमान जगात सर्वात जास्त होते. गेल्या ५० वर्षांत पहिल्यांदाच मार्च महिन्यात देशात दोन मोठ्या उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या आहेत. ही जागतिक तापमानवाढीची मोठी झळ असल्याची माहिती ग्रीन प्लान्ट सोसायटीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक सुरेश चोपडे यांनी दिली.

( हेही वाचा : आता सर्वसामान्यांचे ‘घर’ घेण्याचे स्वप्न महागणार! )

हिमाचल प्रदेशात मार्च महिन्यातील उच्च तापमानाच्या नव्या नोंदी झाल्या. राजस्थानातही उष्णतेची लाट सुरुवातीपासूनच प्रखर राहिली. मध्य भारतही होरपळला. राज्यात विदर्भापाठोपाठ मध्य महाराष्ट्र आणि कधी नव्हे ते उत्तर कोकणताही उष्णतेच्या लाटांची झळ बसली. सलग चार दिवस विदर्भातील तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे चंद्रपूर, अकोला, वर्धा तसेच राजस्थानातील काही ठिकाणची नोंद जगातील उष्ण शहरांच्या पहिल्या दहा ते पंधरा यादीत झाली आहे.

देशाच्या उत्तर भागापासून ते मध्य भारतापर्यंत उष्णतेची एवढी मोठी लाट पहिल्यांदाच आल्याची माहिती चोपडे यांनी दिली. ऐन मार्च महिन्यात हिमाचल प्रदेशात उष्णतेची लाट येणे हे चांगले लक्षण नाही. केंद्र सरकारने जागतिक तापमानवाढ रोखायला आता तातडीने हालचाली करायला हव्यात, असा गंभीर इशारा चोपडे यांनी दिला.

काय होणार?

जागतिक तापमानवाढीची झळ प्रत्येक भौगोलिक भागांत वेगवेगळी दिसून येईल. भारतात कमी दिवसांत जास्त पाऊस होईल. परिणामी, पूरजन्य परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. कमी काळात होणार्‍या पूरजन्य परिस्थितीसाठी कारणीभूत ठरणारा पाऊस हे जागतिक तापमावाढीचे लक्षण असल्याचे चोपडे म्हणाले.

मार्च महिन्यात सुरु झालेल्या उष्णतेच्या लाटांची झळ जागतिक तापमानाच्या नोंदीत देशातील महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि झारखंड राज्यातील शहरांमध्ये आढळून आली.

सर्वात जास्त उष्ण देशांच्या यादीत शहरांच्या नोंदी पुढीलप्रमाणे …

  • चंद्रपूर – राज्यातील विदर्भातील चंद्रपूर हे ४३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानच्या नोंदीमुळे जगभरात पहिल्या स्थानावर पोहोचले. गेले चार दिवस चंद्रपूर देशातील सर्वात जास्त कमाल तापमानच्या नोंदीत अग्रेसर ठरला आहे.
  • भूज – गुजरात राज्यातील भूज येथे ४३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंदीमुळे जगात तिस-या स्थानावर पोहोचले.
  • दल्तोंगराज – झारखंड राज्यातील दल्तोंगराज येथेही कमाल तापमान ४३.४ अंश सेल्सिअस नोंदीमुळे जागतिक क्रमांकावर चौथे स्थान मिळाले.
  • खारगाव – मध्य प्रदेशातील ४३.२ कमाल तापमानाची नोंद झाल्याने जागतिक पातळीवर आठवे स्थान मिळाले.
  • अकोला – राज्यातील विदर्भातील ४३.१ अंश कमाल तापमानामुळे जागतिक यादीत दहाव्या स्थानावर अकोल्याची नोंद झाली.
  • अहमदनगर – ४३ अंश सेल्सिअस एवढी कमाल तापमानाची नोंद अहमदनगर येथे झाली. त्यामुळे जागतिक पातळीवर उष्ण शहरांच्या यादीत अकराव्या स्थानावर अहमदनगर शहराची नोंद झाली.
  • ब्रह्मपुरी – बाराव्या स्थानावर ब्रह्मपूरी हे शहर दिसून आले. ब्रद्मपूरीतही ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
  • मालेगाव – चौदाव्या स्थानावर ४३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंदीमुळे मालेगावाचे नाव कोरले गेले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.