आदित्य ठाकरेंच्या टीकेला मनसेचं प्रत्युत्तर; म्हणाले, शिवसेना तर…

73

गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा झाली. दोन वर्षांनी मनसेचा पाडवा मेळावा आयोजित करण्यात आला होता. नेहमीप्रमाणेच राज ठाकरेंच्या सभेला मनसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावेळी राज ठाकरे यांनी थेट नाव घेत शिवसेनेवर निशाणा साधला. तेव्हापासूनच दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंच्या सभेनंतर महाविकास आघाडीकडून त्यांच्या वक्तव्यांवर टीका केली जात आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले आहे. या टीकेलाच मनसेकडून चोख प्रत्युत्तर दिले आहे.

(हेही वाचा – श्रीलंकेत राजकीय उलथापालथ; पंतप्रधानांच्या मुलासह संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा)

अशा परिस्थितीत सोमवार मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे, असा पलटवार केला आहे. राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसे ही भाजपची ‘सी’ टीम असल्याची टीका पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली होती. याच टीकेला मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मनसेचा पलटवार

“मला असे वाटते की, शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे. ज्या पद्धतीने यांचा भ्रष्टाचार चालू आहे, ज्या पद्धतीने विरप्पन गँग महानगरपालिकेमध्ये सक्रीय आहे, आता हजारो कोटी रुपयांचा हिशोब ईडीला द्यायचा आहे. काय केले, कुठे-कुठे पैसे खाल्ले याचा हिशोब ईडी मागत आहे. त्यामुळे ईडीला हिशोब कसा द्यावा, यावर आदित्य ठाकरेंनी लक्ष द्यावे. आमच्याबद्दल बोलण्याची गरज नाही, आमचे काय ते आम्ही बघून घेऊ. तुमच्यावर जी ईडीला हिशोब द्यायची वेळ आली आहे, ते नीट करा तेवढेच पुष्कळ झाले.” असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. कालच्या गडकरी-राज ठाकरेंच्या भेटीमुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याच मुद्यावरुन मनसेने शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका केली आहे. तसेच युती आघाडीचा निर्णय राज ठाकरे घेतील, असेही संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

आमचे हिंदुत्व वचनं पूर्ण करण्याचे आणि सेवा करण्याचे आहे. मनसेला मी टाइमपास टोळी म्हणायचो कारण ते टाइमपासच करायचे. पण आता मला बरं वाटतंय की भाजपाची सी टीम म्हणून त्यांना थोडे काम मिळाले आहे. बी टीम एमआयएम आहे आणि सी टीम मनसे आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.