देशात वाढत्या इंधन दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सातत्याने होणा-या वाढीमुळे सर्वसामांन्यांच्या खिशाला गळती लागली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीचा हा भडका कमी होण्याची चिन्हं नसताना, आता याचबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठं विधान केलं आहे. केंद्र सरकार एक नवी यंत्रणा तयार करत असून, त्यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्यास नक्कीच मदत होईल, असे त्यांनी सांगितले आहे.
स्वस्त दरात मिळू शकते इंधन
सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर महागाई वाढली आहे. गेल्या 14 दिवसांत पेट्रोलच्या दरांत 8.40 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या देशाला सवलतीच्या दरांत इंधन हवे आहे. रशियाने दिलेल्या ऑफरनंतर भारताकडून स्वस्त तेलाची खरेदी सुरू करण्यात आली असून, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहणार आहे. त्यामुळे येत्या काळात स्वस्त तेलासह कंपन्यांचे मार्जिनही सुधारणार आहे. तसेच सरकार उत्पादन शुल्कातही सवलत देण्याच्या विचार करत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्तवली आहे.
(हेही वाचाः महागाई पाठ सोडेना! आता लिंबाने टाकले पेट्रोलला मागे)
सवलतीत तेल का खरेदी करू नये?
भारतातील एकूण मागणीच्या 85 टक्के कच्चे तेल भारताला आयात करावे लागत आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर जगभरातील अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. पण आपण रशियाकडून तेलाची खरेदी सुरू केली असून, किमान तीन ते चार दिवसांसाठी तेल खरेदी करण्यात आले आहे. आपल्यासाठी आपल्या देशाचे हित प्रथम स्थानावर आहे. जर रशियाकडून मिळणारा कच्च्या तेलाचा पुरवठा सवलतीच्या दरात उपलब्ध होत असेल, तर आपण तो का घेऊ नये? जर युरोप महिन्याभरापूर्वी रशियाकडून 15 टक्के अधिक तेल आणि वायूची खरेदी करत असेल, तर मग भारताने खरेदी का करू नये, असा सवालही निर्मला सीतारामन यांनी केला आहे.
(हेही वाचाः देशात पेट्रोल-डिझेल महागले! मुंबईतील दरवाढ वाचून थक्क व्हाल)
Join Our WhatsApp Community