एसटीअभावी प्रवाशांचे आतोनात हाल, अद्यापही संप सुरुच

92

लालपरीचे राज्यात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून संपावर आहेत. एसटीच्या संपामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून असलेल्या विशेषत: ग्रामीण भागांतील विद्यार्थी, कर्माचा-यांचे अतोनात हाल होत आहेत. प्रवाशांची इतक्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असताना, राज्य सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.

अन्य गावांना जाण्यासाठी बस नाही

संपामुळे एसटीच्या पुणे विभागाच्या ७६० बस आगारातच उभ्या आहेत. संपापूर्वी पुणे विभागात एकूण ९५० बस धावत होत्या. त्यापैकी १९० बस मार्गांवर आहेत. त्यातील बहुतांशी बस महामार्ग, राज्यमार्ग किंवा तालुक्याच्या ठिकाणापर्यंतच धावतात. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणापासून अन्य गावांना जाण्यासाठी बससेवा नाही.

मुंबईत दाखल होणार संपकरी कर्मचारी

मुंबई शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ तालुक्यांतील ग्रामीण आणि आदिवासी भागांना जोडणाऱ्या एसटीची सेवा विस्कळीत असल्यामुळे ग्रामीण भागांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला एसटी संपाची सर्वाधिक झळ पोहोचली आहे. कोकणातील सुमारे ८० टक्के संपकरी कर्मचारी मंगळवारी होणाऱ्या न्यायालयातील सुनावणीसाठी मुंबईत दाखल होणार आहेत.

( हेही वाचा: जाणून घ्या, भारतात इलेक्ट्रिक गाड्या पेट का घेताहेत? )

मंगळवारी सुनावणी

एसटी विलीनीकरणासंदर्भात अद्याप तोडगा निघालेला नाही. एसटी विलीनीकरणावर बाजू मांडण्यासाठी आम्हाला 15 दिवस द्या, अशी विनंती राज्य सरकारतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली  होती. त्यानुसार, मंगळवार 5 एप्रिल रोजी यावर सुनावणी होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.