दादर माहिममध्ये मागील काही दिवसांपासून लेडी जमशेटजी मार्गावर अनधिकृत डेब्रीज टाकण्याचे प्रकार घडत असून मागील दहा दिवसांमध्येच या रस्त्यावर तिसऱ्यांदा डेब्रीज रस्त्यांवर टाकण्याचा प्रकार घडला आहे. मंगळवारी एल.जे. रोडवरील शितलादेवी मंदिराशेजारी हे डेब्रीज टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे धारावीसह एल.जे.रोडवर तिसऱ्यांदा अशाप्रकारे डेब्रीज फेकण्यात आल्याने याविरोधात महापालिकेच्या जी उत्तर विभागाने माहिम पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच राज्य परिवहन विभागाकडेही तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.
( हेही वाचा : संजय राऊतांकडे किती आहे संपत्ती? जाणून घ्या… )
अनधिकृत राडारोडा टाकून ट्रक चालक काढतात पळ
मुंबईत इमारतीच्या बांधकामांसह अन्य कोणत्याही प्रकाराचा राडारोडा असल्यास महापालिकेच्या हेल्पलाईनवर संपर्क साधून त्यानुसार शुल्क भरल्यानंतर त्या राडारोड्यांची विल्हेवाट लावली जाते. परंतु महापालिकेच्यावतीने सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतरही मुंबईत अशाप्रकारे अनधिकृत राडारोडा टाकून ट्रक चालक पळ काढत आहेत.
माहिम पोलीस ठाण्यात तक्रार
अशाचप्रकारे माहिम येथील लेडी जमशेटजी मार्गावरील सिटीलाईट सिनेमाजवळील माहिमच्या दिशेकडे असलेल्या बेस्ट बसस्टॉपवरच २६ मार्च रोजी डेब्रीज टाकण्यात आले होते. रात्री उशिरा हे डेब्रीज टाकण्यात आले होते. त्यानंतर धारावीमध्येही अशाप्रकारे रस्त्यांवर डेब्रीज टाकण्यात आले होते. सोमवारी मध्यरात्री तर माहिममधील एल.जे. रोडवरील सितलादेवी मार्गावर डेब्रीज टाकले गेले. मध्यरात्री हा ट्रक रिकामा केला जात असल्याचे सी.सी.टीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या सी.सी.टीव्ही फुटेजच्या आधारे महापालिकेच्या जी उत्तर विभागातील अधिकाऱ्यांनी माहिम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. अशाप्रकारे डेब्रीज रस्त्यांवर टाकणाऱ्या समाजविघातक शक्तींवर कारवाई करण्याची मागणी या तक्रारीत केली असून प्रादेषिक परिवहन कार्यालयाकडेही याबाबत तक्रार नोंदवण्यात आल्याची माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.
Join Our WhatsApp Community