ईडीने मागील १५ दिवसांत शिवसेना नेत्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा धडाका लावला आहे. ईडीच्या कारवाईचे हे टायमिंग सध्या जोरदार चर्चेत आले आहे. ईडीने आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची जवळपास साडे सहा कोटींची संपत्ती जप्त केली होती, त्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली, आता भाजपला शिंगावर घेणारे नेते संजय राऊत यांचे अलिबागमधील ९ भूखंड आणि दादरमधील राहता फ्लॅट ईडीने सील केला आहे.
श्रीधर पाटणकरांवर कारवाई करून पहिला दणका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची २२ मार्च रोजी पुष्पक बुलियन प्रकरणात पैशांच्या अफरातफरी प्रकरणी ईडीने जवळपास साडे सहा कोटी रुपयांची मालमत्ता सील करुन महाविकास आघाडीला पहिला दणका दिला. त्यानंतरच्या तीन दिवसांतच म्हणजेच २५ मार्च रोजी ईडीने दुसरा धक्का दिला. एनएसईएल आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आमदार प्रताप सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाखांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली. सरनाईकांच्या कारवाईला १० दिवस उलटत नाही तोच ईडीने पुन्हा तिसरा धक्का दिला. ५ एप्रिल रोजी 1 हजार 34 कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने खासदार संजय राऊत यांची प्रॉपर्टी सील केली.
(हेही वाचा संजय राऊतांकडे किती आहे संपत्ती? जाणून घ्या…)
सरकार पाडण्यासाठी भाजप ईडीचा वापर करत
सेना नेत्यांची मालमत्ता जप्त करण्यासंबंधी ईडीचे टायमिंग पाहिले असता केवळ पंधरा दिवसांच्या आत सेनेच्या संबंधी तीन व्यक्तींवर ईडीने कारवाई केली आहे. या कारवाईचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप सेना नेते करत आहेत. राज्यातले महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप ईडीचा वापर करत आहे. त्यातूनच सेनेच्या संबंधित लोकांवर ईडी कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केला आहे. एकंदर फक्त १५ दिवसांमध्ये ईडीने सेनेच्या ३ लोकांची संपत्ती जप्त केल्याने महाविकास आघाडीच्या गोटात विशेषत: शिवसेनेत खळबळ माजली आहे. भाजपला अंगावर घेणाऱ्या नेत्यांवर ईडी कारवाई करत असल्याचे उघड दिसत आहे.
Join Our WhatsApp Community