भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. आयएनएस विक्रांत जहाज वाचवण्यासाठी सोमय्यांनी पैसे जमा केले होते. ते पैसे राज्यपाल कार्यालयात पोहोचलेच नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार कायद्यांर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2014 साली विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करण्याची मोहीम सुरु केली होती. या मोहीमेत 57 ते 58 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली होती. हा पैसा त्यांनी 2014 ची निवडणूक लढवण्यासाठी आणि त्यांच्या निकॉन इन्फ्रा कंपनीत वळवला. हा घोटाळा करून किरीट सोमय्या यांनी देशाच्या संरक्षणव्यवस्थेशी, राष्ट्रीय भावनेशी केलेली प्रतरणा आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
राऊतांचा गंभीर आरोप
किरीट सोमय्या जेव्हा विक्रांत युद्धनौका वाचवण्यासाठी पैसे गोळा करत होते तेव्हा चर्चगेट स्थानकात काही लोकांनी पाच- पाच हजार रुपये देऊ केले होते. किरीट सोमय्या हे नेव्ही नगरमध्ये गेले होते. त्या ठिकाणी विक्रांत युद्धनौकेवर काम केलेल्या कर्मचा-यांनी तर या मोहीमेसाठी 50 हजार रुपयेही देऊ केले होते. प्रत्यक्षात या मोहिमेत 100 कोटी रुपये जमा झाले असतील. हे पैसे किरीट सोमय्या यांनी 2014 च्या निवडणुकीत वापरल्याचा संशय आहे. महाराष्ट्रातील पोलीस या सगळ्याची चौकशी करतीलच. केंद्रीय तपास यंत्रणांनी नि:पक्षपातीपणे तपास करावा, असेही राऊतांनी यावेळी म्हटले आहे.
( हेही वाचा: एसटी कर्मचारी संभ्रमात! महामंडळ मूळ याचिकाच घेणार मागे? )
हे आहे प्रकरण
‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेने 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. सन 1961 मध्ये नौदलात दाखल झालेल्या “आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. ‘विक्रांत’ वाचवण्यासाठी सोमय्या यांनी सामान्य नागरिकांपासून सर्वच स्तरातील व्यक्तींकडून निधी जमवला होता.