‘या’ प्रकरणी दरेकरांनी पाठविली भाई जगतापांना कायेदशीर नोटीस

लेखी माफी न मागितल्यास १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा

150

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती जिल्हा बँक कथित गैरव्यवहारप्रकरणी केलेले वक्तव्य तथ्यहीन, निराधार व सबळ पुराव्याशिवाय तसेच कोणतीही शहानिशा न करता केलेले आहे. यामुळे समाजातील माझी प्रतिमा मलिन झाली असून या विरोधात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते व मुंबई बॅंकेचे संचालक प्रविण दरेकर यांनी भाई जगताप यांना बुधवारी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. दरेकर यांच्याविरोधातील वक्तव्याप्रकरणी भाई जगताप यांनी ७ दिवसांच्या आतमध्ये त्यांची लेखी माफी मागितली नाही तर जगताप यांच्याविरोधात १०० कोटीचा अब्रुनुकसानीची दावा दाखल करण्यात येईल व त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अँड. अखिलेश चौबे यांनी दिली.

कोणतीही घटनांची खातरजमा न करता बदनामीकारक वक्तव्य

विरोधी पक्ष नेते दरेकर यांचे वकील अँड. अखिलेश चौबे यांच्यामार्फत भाई जगताप यांना आज कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. सदर नोटीशीत नमूद करण्यात आले आहे की, दरेकर गेली २० वर्षे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. यापैकी तसेच १२ वर्षे बँकेचे अध्यक्ष होते. या काळात बँकेला एक उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम दरेकर यांनी केले. नाबार्ड यांनी बँकेच्या कामगिरीची दखल घेऊन तसे प्रशस्तीपत्रक देखील मुंबई बँकेला दिले आहे. असे असतानाही भाई जगताप यांनी कोणतीही घटनांची खातरजमा न करता माझ्याविरोधात केवळ राजकीय सूडबूध्दीने व राजकीय कारणांमुळे बदनामीकारक वक्तव्य केली. जगताप यांनी फक्त दरेकर यांचीच नव्हे तर लाखो ठेवीदारांच्या ठेवी असलेल्या मुंबई बँकेच्या खातेधारकांचीही आपल्या निराधार वक्तव्यांच्या माध्यमातून विनाकारण नाहक बदनामी केले आहे. जगताप याच्या निराधार वक्तव्यामुळे दरेकर यांची समाजात बदनामी झाली आहे असेही अँड. अखिलेश चौबे यांनी जगताप यांना पाठविलेल्या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.

(हेही वाचा – राऊतांवरील कारवाईविषयी पंतप्रधानांना कळवले, पण…काय म्हणाले शरद पवार?)

जगताप यांनी या वक्तव्याप्रकरणी सात दिवसाच्या आतमध्ये लेखी माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल. भाई जगताप यांनी प्रविण दरेकर यांच्याविरोधात मानहानीकारक वक्तव्य करून दूरचित्रवाणी, प्रसारमाध्यमांमार्फत समाजताच तसेच सहकार व राजकीय क्षेत्रात दरेकर यांची प्रतिमा मलिन केली आहे. असेही सदर नोटीशीत मांडण्यात आले आहे.

नोटीसमध्ये दरेकर काय म्हणाले?

गेली २० वर्षे मुंबई जिल्हा बँकेचे मजूर असल्याचा खोटा बनाव करून मुंबई बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून येणारे आणि मुंबई बँकेमध्ये २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे भाजपचे आमदार आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे आज आपला भ्रष्टाचार, आपले पितळ संपूर्ण जगासमोर उघडे पडल्यावर सावपणाचा आव आणून ट्वीटरच्या माध्यमातून माझ्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा करत आहेत. त्यांच्यात जर हिम्मत असेल तर त्यांनी अब्रूनुकसानीचा दावा ठोकून दाखवावा, असे खुले आव्हान भाई जगताप यांनी दरेकर यांना काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत दिले होते, त्याचा उल्लेखही या नोटीशीमध्ये करण्यात आला आहे. मुंबई बॅंकेतील घोटाळ्याप्रकरणी प्रविण दरेकर यांनी राजीनामा द्यावा तसेच त्यांची ईडी व आयकर विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी तथ्यहीन वक्तव्ये कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय करून जगताप यांनी दरेकर यांना मानसिक त्रासदेखील केला आहे, असे नोटीसमध्ये दरेकर यांनी नमूद केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.