महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सध्या केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा सुरु आहे. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली. त्यामुळे खळबळ माजली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, त्यावेळी पवार यांनी संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा विषय मांडला, त्यामुळे राऊत यांनी पवार यांचे आभार मानले.
राजकीय दबावापोटी मविआच्या नेत्यांवर कारवाई
बुधवारी, ६ एप्रिल रोजी शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी माझ्यावर झालेल्या कारवाईच्या अनुषंगाने पंतप्रधान मोदींसमोर मु्द्दे मांडले. पवारसाहेबांचे मी आभार मानतो. राजकीय दबावापोटी मविआच्या नेत्यांवर कारवाई होत आहे, हे पंतप्रधान मोदी यांनी लक्षात घ्यावे, असे शिवसेना नेते राऊत म्हणाले.
(हेही वाचा राऊतांवरील कारवाईविषयी पंतप्रधानांना कळवले, पण…काय म्हणाले शरद पवार?)
१२ आमदारांच्या नियुक्तीवर मिश्किल टीका
लक्षद्वीपचे प्रश्न, संजय राऊत यांच्याविरोधातली सूडाने केलेली कारवाई, राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रलंबित प्रश्न, असे सगळे विषय पवारांनी मोदींच्या कानावर टाकले. प्रामुख्याने संजय राऊत यांच्याविरोधात झालेली कारवाई कशी चुकीची आहे, हे पवारांनी मोदींना पटवून सांगितले. राऊतांविरोधातली कारवाई म्हणजे त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय असल्याचे पवार म्हणाले. पवारांनी राऊतांसाठी लढवलेली खिंड राऊतांना भावली. म्हणूनच त्यांनी पवारांचे आभार मानले आहेत. तसेच राजकीय दबावातून केंद्रीय यंत्रणांचा चुकीच्या पद्धतीने वापर होतो आहे. पंतप्रधानांनी यावर लक्ष देण्याची गरज आहे. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबतही सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. नाहीतर पंतप्रधान लक्ष घालेपर्यंत त्यांचा कार्यकाळ संपून जाईल, असा टोला राऊतांनी लगावला.
Join Our WhatsApp Community