नाशिकमधील महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राज्य पाठ्यपुस्तक भांडाराच्या कार्यालयात चक्क अधिकारी दारू पिताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर राज्य पाठ्यपुस्तक विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच दारूचे धडे गिरवले असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने स्टींग ऑपरेशन करून या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
(हेही वाचा – मुंबईकरांना लवकरच बसणार वीज दरवाढीचा शॉक?)
मिळालेल्या माहितीनुसार, भांडार व्यवस्थापक या कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून रोज दारू पीत होते. त्यानंतर त्यांचे कृत्य चव्हाट्यावर आणण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने व्हिडीओ तयार केला. आता या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. त्याकडे कोणाचेही कसे काय लक्ष गेले नाही, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकार
नाशिकमधील लेखानगर या भागात महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडाराचे कार्यालय आहे. येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे पुस्तकांची निर्मिती होत असते. कार्यालयातील अनेक खोल्यांमध्ये पुस्तकाचे गठ्ठे आहेत. मात्र, या पुस्तकांच्या गठ्ठ्यांना लागणारे हात आधी दारूच्या ग्लासला लागल्याचे समोर येत आहे. या कार्यालयाचे व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे हे रोज एका खोलीत दारू पित बसायचे, असे सांगितले जात आहे. हा सारा प्रकार आता समोर आला आहे. शिवाय एका पलंगावर डामसे हे स्वतः दारू पित असल्याचे समोर आले आहे.