शिवसेना नेते संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली. त्यानंतर राऊत दोन दिवसांनी गुरुवारी, ७ एप्रिल रोजी मुंबईत परतले, तेव्हा त्यांचे शिवसैनिकांनी जंगी स्वागत केले. हे स्वागत म्हणजे पुण्यातील गुंड गजाजन मारणे याच्या प्रमाणे होते, अशी खोचक टीका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
गजानन मारणे हा आदर्श व्यक्ती ठरू शकत नाही
संजय राऊत यांच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीचे शिवसेना समर्थन करेल, पुण्यातील गुंड गजानन मारणे हा जेव्हा तुरुंगातून सुटला तेव्हा त्याचेही जंगी स्वागत करण्यात आले होते. जंगी स्वागत होणे याचा अर्थ ती व्यक्ती आदर्श असणे असे म्हणता येत नाही. उद्या जंगी स्वागत झाले म्हणून गजानन मारणे हा आदर्श व्यक्ती ठरू शकत नाही. अन्यथा घराघरात आई-वडील त्यांच्या मुलांना तू गजाजन मारणे सारखे कर, असे म्हणतील. माझ्या दृष्टीने संजय राऊत यांचे स्वागत महत्वाचे नाही, फक्त मुद्दा एकच आहे, जर गुन्हेगार, वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे जंगी स्वागत होत असेल, तर सज्जन व्यक्तींनाही त्या व्यक्तीसारखे वागण्याची इच्छा होऊ शकते, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली.
राऊत म्हणजे शब्द बापुडे केवळ वारा
संजय राऊत हादरले आहे, त्यामुळे ते आता न्यायालयही आमच्या बाजूने नाही, असे म्हणत आहेत. राऊत हे भ्रमिष्ट झालेले आहेत. त्यांच्यासाठी भगवे झेंडे आणले हा भारतीय संस्कृती, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अवमान आहे. त्यांनी हिरवे झेंडे नाचवावेत. दाऊदशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिकाची न्यायालयाने दखल घेतली आहे. राऊतांनी त्यांच्यावरील आरोपाच्या चौकशीला सामोरे जावे. शब्द बापुडे केवळ वारा, अशी संजय राऊत यांची अवस्था आहे. त्यांनी साधी ग्रामपंचायत निवडणूक लढवली नाही. त्यांना काय महत्व द्यायचे. राऊत आमच्यासाठी अदखलपात्र आहेत, अशी प्रतिक्रिया भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिली.
राऊतांचे विमानतळाच्या स्वागत
ईडीने संजय राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील ८ भूखंड जप्त करण्याची कारवाई केली. त्यानंतर दोन दिवसांनी संजय राऊत मुंबईत परतले त्यावेळी मुंबई विमानतळावर मोठ्या संख्यने शिवसैनिक राऊतांच्या स्वागतासाठी जमले होते. त्यावेळी खासदार विनायक राऊत, राऊत यांचे बंदी आमदार सुनील राऊत, आमदार सुनील प्रभू हे उपस्थित होते.यावेळी शिवसैनिकांनी विमानतळावर शक्तिप्रदर्शन केले. मुंबई विमानतळावर घोषणाबाजी करत होते. डरेंगे नही, झुकेंगे नही, अशा घोषणा देत होते. संजय राऊत यांचा ‘योद्धा’ म्हणून उल्लेख करण्यात आलेले बॅनर दाखवण्यात आले होते.