शिवसेना भवनासमोर मनसेकडून भोंग्यावर ‘हनुमान चालीसा’ पठण

104

गुढीपाडव्यानिमित्ताने शिवाजी पार्कवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या भाषणानंतर सर्व मनसैनिकांना पुन्हा एकदा उभारी आल्याचे दिसून येत आहे. राज ठाकरेंनी केलेले ‘मशीदीवरील भोंगे हटवा, अन्यथा हनुमान चालीसा लावू’, हे विधान सध्या वादग्रस्त ठरत आहे. यानंतर मनसैनिकांनी ठिकठिकाणी भोंगे लावायला सुरुवातही केली. या पार्श्वभूमीवर आता मनसेनेने आता शिवसेना पक्षाचं मुख्यालय असलेल्या ‘शिवसेना भवना’बाहेर भोंगे लावले आहेत. या भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्यात आली आहे. आज रामनवमीच्या निमित्ताने मनसेनं शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसत आहे.

हिंदुत्व विसरलेल्या सेनेला जाग आणण्याचा मनसेकडून प्रयत्न

हिंदुत्व विसरलेल्या शिवसेनेला जाग आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटले आहे. पण काही वेळातच पोलिसांनी मनसेकडून लावण्यात आलेला भोंगा जप्त करून यशवंत किल्लेदारांसह मनसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय. यासह मनसेचे हे भोंगे जप्त केले असून मनसैनिकांनी राबवलेल्या या उपक्रमाला प्रशासनाने ठिकठिकाणी हरकत घेतल्याचेही दिसून आले आहे. एका टॅक्सीवर हा भोंगा लावून हनुमान चालीसा लावण्यात आली. ज्या मंदिर, मंडळाला मनसेचा हा रथ हवा असेल तिथे तिथे तो फिरवला जाणार असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी सांगितले होते.

(हेही वाचा – मुंबईतील मलतुंबई : १५ ते २० वर्षांत झाली नाही मलवाहिन्यांची सफाई)

मनसेने लावली रामनवमीला नाकावर टिच्चून चालिसा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जिथे मशिदींवर भोंगे लावून अजान सुरू असेल तिथे दुप्पट लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच घाटकोपर येथे मनसेच्या कार्यालयावर भोंगे लावून हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले होते. पण पोलिसांनी काही वेळातच मनसेच्या कार्यालयावरील लावण्यात आलेले भोंगे काढून मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली होती. त्यानंतर आज रामनवमीच्या निमित्ताने मनसेकडून चक्क शिवसेना भवनासमोरच हनुमान चालीसा लावली गेली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.