एसटीच्या कामगारांनी ५ महिने संप केला. त्यानंतर आता एसटी सेवा पूर्ववत कशी करायची, कामगारांची पुनर्नियुक्ती कशी करायची, दीर्घकाळ एसटीच्या बसगाड्या बंद होत्या त्या दुरुस्त करण्यासाठी किती निधीची तरतूद करायची या विषयांसह कोरोना पूर्व काळातील सर्व मार्ग पुन्हा कसे सुरु करायचे, या विषयावर राज्य परिवहन महामंडळाची बैठक 11 एप्रिल रोजी झाली. आता कोरोना गेला आणि संपही मिटला आहे, त्यामुळे एसटी पूर्वीप्रमाणे धावणार आहे, असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला.
एसटीच्या १०९ कामगारांवर नियमानुसार कारवाई!
राज्य परिवहन महामंडळाच्या संपकरी कामगारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. हा हल्ला करणाऱ्या १०९ एसटीच्या कामगारांवर महामंडळाच्या नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे, असे महामंडळाच्या बैठकीत ठरवण्यात आले आहे, असे मंत्री परब म्हणाले.
(हेही वाचा सदावर्तेंना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी)
सदावर्तेंनी वसुली केली
एसटीच्या कामगारांना भडकावणारा खरा सूत्रधार वकील सदावर्ते आहेत, अशी बाजू सरकारने न्यायालयात मांडली आहे. त्यामुळे त्यांची पोलीस कोठडी मागण्यात आली. सदावर्ते यांनी एसटीच्या कामगारांना प्रलोभने दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली आहे. कारण त्या आशयाच्या विविध तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. चार ते पाच पोलीस ठाण्यात याविषयी फसवणुकीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या सगळ्या तक्रारींची हळूहळू चौकशी होणार आहे, असेही मंत्री परब म्हणाले.
Join Our WhatsApp Community